धाराशिव / प्रतिनिधी-

 जाहीरपणे बोलताना सत्ताधार्‍यांना आवडेल, असे बोलणे योग्य नाही. जे सत्य असेल ते लिहा, निर्भीडपणे लोकांसमोर व्यक्त व्हा, तरच देशाच्या लोकशाहीचे संरक्षण होऊ शकते, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले.

नगरपालिकेच्या नाट्यगृहात गुरूवारी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील लिखित ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, लेखक नानासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व त्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.

पुढे बोलताना सुराणा म्हणाले की, मराठवाडा अवर्षणग्रस्त आहे. शेतीला पाणी नसल्याने संपूर्ण अर्थकरण बिघडते. कृष्णेचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी लेखक नानासाहेब पाटील यांनी चिकाटीने आपल्या लिखाणातून प्रयत्न केले. सार्वजनिक त्यांनी जीवनात जबाबदारीने भाग घेऊन प्रयत्न केले, महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न आणि वस्तुस्थिती त्यांनी आपल्या लेखातून मांडली. त्यांचे सर्व लेख वाचनीय आणि मननीय आहेत, असेही त्यांनी नमुद केले.  

पत्रकार राजीव खांडेकर यांनी, पाटील यांचा लेखसंग्रह म्हणजे समकालीन इतिहास असून बहुमताच्या जोरावर मनमानी आणि बेरजेच्या राजकारणातून लोकशाहीला बाहेर काढण्यासाठी वाचकांच्या डोळ्यात अंजन घालणारे त्यांचे लेख असल्याचे नमुद केले. तर ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस म्हणाले की, इडीच्या धाडी सगळ्या पक्षांच्या नेत्यांवर पडल्या पाहिजेत. भाजप नेते म्हणजे सभ्यतेची उदाहरणे नव्हे. आजमितीस 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील लोकशाही ही चुकीच्या राजकारणामुळे खचली. सत्येची गणिते खोक्यातूनच चालतात आणि शहाण्या माणसाने राजकारणात पडू नये, अशी अवस्था आहे. त्यामुळे समाजिक क्रांती ही अंतिम क्रांती व्हावी आणि लोकशाही बळकळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पाटील यांनी दिग्गज नेत्यांच्या तत्कालीन भूमिका आणि पुस्तकातील भाषाशैली याबाबत लेखकांचे कौतूक केले.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले. त्यानंतर लेखक नानासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रवींद्र केसकर तर आभार डॉ. अस्मिता चिंचोले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पाटील यांचे स्नेही व शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. 


 
Top