धाराशिव / प्रतिनिधी-

 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा निजाम संस्थानातून संयुक्त महाराष्ट्रात विलीन झाला. मराठवाड्यातील जनतेच्या आशा  आकांक्षांना पालवी फुटली अन प्रत्येकाच्या मनात शैक्षणिक, सामाजिक ,आर्थिक ,सांस्कृतिक, राजकीयदृष्ट्या सर्व संपन्न होईल असे वाटले होते परंतु मराठवाड्यातील लोकांचा भ्रह्मनिरास झाला. यामुळे मराठवाडयाला न्याय मिळण्यासाठी मराठवाड्याचा  विकास होण्यासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्माण करा, अशी मागणी प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. रेवण भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

  प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे पक्षप्रमुख एकतर पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई येथील असल्यामुळे त्यांना मराठवाड्यातील गुलाम राजकारण्यावर मालकी हक्क गाजवण्याची सवय जडलेली असल्यामुळे स्वतंत्र मराठवाडा राज्याची बीजं पेरू दिली गेली नाहीत. मात्र विदर्भातील नेत्यांनी गेल्या 40 वर्षापासून स्वतंत्र विदर्भासाठी संघर्ष सुरू ठेवलेला आहे. याच प्रश्नावरती भाजपने लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढविल्यामुळे विदर्भात सर्व पक्षाचे पानिपत झाले व 'न भूतो व न भविष्यती 'असे भाजपचे उमेदवार निवडून आले .आता सरकारची नैतिक जबाबदारी आहे की विदर्भ स्वतंत्र राज्य करणे. सरकारचे आता दोन वर्ष बाकी असताना स्वतंत्र विदर्भ राज्य होणार असल्याच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत.

      .    तेव्हा मराठवाड्यातील नेत्यांनी व जनतेने स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीसाठी आग्रही व्हावे व स्वतःचा विकास करून घेण्याचा प्रयत्न करावा. पश्चिम महाराष्ट्रातील व मुंबईतील नेते याला विरोध करतीलच कारण मराठवाड्यातील गुलाम नेते त्यांच्या हातून निघून जातील. मराठवाडा गुलामच ठेवण्यात त्यांना रस आहे. भावनिक विषय जनतेसमोर ठेवून त्यांना मराठवाड्यावर राज्य करावयाचे आहे .मराठवाड्याला प्रगती पासून वंचित ठेवायचे आहे. मराठवाड्यात एकही मोठा प्रकल्प न आणता कोकण ,पश्चिम महाराष्ट्र ,मुंबई पुणे व विदर्भाकडे वळवले जात आहेत .हा त्यांचा संधी साधूपणा मराठवाड्यातील तरुणांनी ओळखला पाहिजे. तन, मन,धनाने आपली मागणी रेटली पाहिजे व पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईच्या काळे इंग्रजांच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्त केले पाहिजे ,या अनुषंगाने मराठवाड्यातील जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपदेश केलेला आहे.

      ही अत्यंत अनुरूप अशी गोष्ट आहे .एका लहान मुलीस बरोबर घेऊन तिचे वडील सहली करता जंगलात गेले .मोठ्या वृक्षाखाली वाढलेली लहान झुडपं तिला दिसून आली .चोहीकडे हेच दृश्य पाहिल्यावर त्याने आपल्या वडिलास विचारले की व्रक्षा खालील झुडप वृक्षाप्रमाणेच मोठी का वाढत नाहीत ?त्या मुलीचे वडील वनस्पतीशास्त्र जाणत नसल्यामुळे उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांनी सांगितले की मला त्याचे उत्तर माहित नाही तरीपण त्याला तो प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण वाटला. तो एका महाविद्यालयात प्राध्यापक होता. दुसऱ्या दिवशी तो महाविद्यालयात गेला आणि वनस्पतीशास्त्र शिकविणारे आपल्या सहकारी प्राध्यापकाला तोच प्रश्न विचारला. वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणाला, अरे !त्याचे उत्तर अगदी साधे आहे. मोठे वृक्ष सूर्याच्या सर्व प्रकाश किरणांचा स्वतःच उपयोग करून घेतात .मोठ्या वृक्षाखाली असलेल्या झुडपांना  एकही प्रकाश किरण मिळू देत नाहीत म्हणून ती झुडपं वाढत नाहीत.

       मराठवाड्यातील लोकांनी या गोष्टीतील मर्म आणि भावार्थ मुळीच विसरू नये. मराठवाड्यातील अथवा मध्य महाराष्ट्रातील लोकांनी आता स्वतःचेच राज्य निर्माण करावे ज्यायोगे स्वतःची प्रगती करून घेण्याचे सर्व अधिकार त्यांच्याच हाती राहतील.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 23 डिसेंबर 1955 ला भाषावार प्रांतरचना पान नंबर 27 ,28 मध्ये आपले विचार मांडले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हे ज्ञात होते की भविष्यकाळात मराठवाड्याची दुरावस्था होणार आहे, म्हणून मराठवाड्यातील लोकांना सावध करून स्वावलंबी बनण्याचा कानमंत्र दिलेला आहे.

      मराठवाड्यातील जनतेला सर्वर्थाने स्वावलंबी ,प्रगतिशील, उद्योगशील ,कृषीप्रधान ,तंत्रप्रगत बनविण्यासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. कारण छोटे राज्य असेल तर लोकांचा वेळ, पैसा वाचतो व कामे तात्काळ होतात. मराठी भाषिक एकापेक्षा जास्त राज्य झाली तर नुकसान काय? सोलापूर- जळगाव लोहमार्ग 2012 पासून प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. जुजबी उपाय केले जातात .शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाहीत .शेतीमालावर प्रक्रिया करणारे कारखाने नाहीत. जिल्हावार कोणतेही कारखाने नाहीत. पाण्याचे स्त्रोत, नद्या ,ओढे ,नाले यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करून दर दहा किलोमीटरवर बंधारे घातलेले नाहीत. तळ्यातील गाळ उपसा कित्येक वर्षापासून केलेला नाही. म्हणून मराठवाड्याचे वाळवंट होत आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे होत असे तीही दरवर्षी होताना दिसत नाही .वैधानिक विकास मंडळ हे 'असून वळींबा आणि नसून कोळंबा 'असेच आहे .देवस्थानाचा विकास तिळमात्र नाही. जागतिक, प्रेक्षणीय, ऐतिहासिक स्थळे वेरूळ, अजिंठा यांची दुरावस्था होत आहे. नैसर्गिक हक्काच्या पाण्यासाठी भिक मागावी लागते. तीही उत्तर महाराष्ट्रातील नेते बळाचा व आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात व सरकारवर दबाव तंत्राचा वापर करतात. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागतात .'आई भिक मागू देईना अन बाप खाऊ  देईना 'अशी परिस्थिती मराठवाड्यातील लोकांची झालेली आहे.

     मराठवाड्यातील मजूर पुणे- मुंबईकडे स्थलांतरित होत आहेत. मराठवाड्यातील सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. राजकारणी नेते व मोठे अधिकारी आडमार्गाने कमवलेला पैसा पुणे मुंबई मध्ये गुंतवत आहेत. म्हणजे मराठवाड्याचे श्रम, बुद्धी व धन हे मराठवाड्याबाहेर जात आहे. आणि मराठवाडा हा सर्वार्थाने कंगाल होत आहे. हे स्वतंत्र राज्य नाही झाले तर एक दिवस मराठवाडा प्रदेश ओस पडेल ,तेव्हा मराठवाड्याची अस्मिता आबादीत ठेवायची असेल तर लोकांनी मराठवाडा राज्याची चळवळ नेटाने पुढे चालवावी लागेल. मराठवाड्यातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना ,विद्यार्थी संघटना, महिला मंडळ या सर्वांनी एकसंघ होऊन मराठवाड्याच्या अस्तित्वाची लढाई लढल्याशिवाय गत्यंतर नाही.

   भारतामध्ये अनेक राज्य आकाराने लहान आहेत, जसे त्रिपुरा ,मेघालय, सिक्कीम ,आसाम ,मणिपूर ,मिझोराम, गोवा ,तेलंगणा ,मग मराठवाडाच का नको?

         मराठवाड्याची माती अत्यंत सुपीक असून कृषीसाठी उपयुक्त जमीन आहे .सिंचनप्रक्रिया योग्य पद्धतीने राबविल्यास ज्वारी ,कापूस, ऊस, गहू ,करडी, हरभरा ,तुर, सोयाबीन ,भुईमूग ,अशासारखी पिक मोठ्या प्रमाणात घेता येतील. असे झाल्यास मराठवाडा हा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला धान्य पुरवू शकतो.

    तसेच मराठवाड्यात जागतिक स्तरावरील प्रेक्षणीय स्थळे मंदिरे, किल्ले आहेत, ज्यापासून महसूल मिळू शकतो, जसे औरंगाबादचे वेरूळ ,अजिंठा ,बेबीचा मकबरा ,पवन चक्की ,देवगिरीचा किल्ला ,पैठण  मंदिर, जालन्याचे राजूर येथील गणपतीचे मंदिर ,परळी येथील वैजनाथाचे मंदिर ,औंढ्याचे नागनाथाचे मंदिर ,नळदुर्गचा किल्ला, उस्मानाबादची बौद्ध लेणी ,लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील गार्डन यापैकी अनेक ठिकाणी परदेशी पर्यटकही येतात .या सर्वांचा विकास केल्यास उत्पन्नाचे फार मोठे साधन होऊ शकते परंतु तशा मानसिकतेची आवश्यकता आहे.

    त्यामुळे मराठवाडा विकसित करण्यासाठी गेलेले वैभव परत उभ करण्यासाठी व स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीसाठी येत्या विधिमंडळ अधिवेशनात ठराव मांडून मंजूर करून घ्यावा व तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवून देण्यासाठी मराठवाड्यातील सर्व आमदारांनी विधानसभेत प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारचे विधानसभेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे या ठरावास कुठेही आडकाठी येणार नाही असे मला वाटते . आपण स्वतः मुख्यमंत्री  म्हणून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही कार्यक्षम व धडाडीचे नेते असल्याचे सर्वांना माहीत आहे .त्यामुळे स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीला आपण हातभार लावल अशी मी अपेक्षा व्यक्त केली. 

 
Top