धाराशिव / प्रतिनिधी-

 शेतरस्त्यांचे जनक अशी ओळख असलेले औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आज (दि.5) शेतरस्ते, गावच्या पाणीपुरवठा योजनांसह ग्रामीण प्रश्नांवर अधिकारी आणि पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

 शेतकर्‍यांच्या उन्नतीमध्ये अडथळा निर्माण असणार्‍या आणि गावकीच्या वादाचा विषय असणार्‍या शेतरस्त्यांचे प्रश्न सोडवून आमदार पवार यांनी मतदारसंघात एक हजार किमीपेक्षा जास्त शेतरस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. आमदार निधीतून शेतरस्ते तयार करता येत नाहीत ही बाब लक्षात आल्यानंतर शासनदरबारी पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावला. औसा मतदारसंघातील शेतरस्त्यांचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागल्यामुळे शिवारांमधून शेतकर्‍यांना शेतीमालाची वाहतूक सोयीची झाली असून आपसात असलेले तंटेही मिटले असल्याचे आ.पवार यांनी सांगितले.

 ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेच्या विजेचा प्रश्नही त्यांनी बारकाईने मांडला. पाणीपुरवठ्याची आणि गावातील वीज जोडणी एकाच डीपीवरुन असल्याने विजेचा खोळंबा झाल्यास पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण होते. त्यामुळे पाणी उपलब्ध असले तरी गावकर्‍यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. म्हणून पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र डीपीची तरतूद करायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. मनमोकळेपणाने संवाद साधताना पदाधिकार्‍यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे मराठवाडा संयोजक पिराजी मंजुळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक प्रवीण पाठक, रविराज मंजुळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top