येरमाळा/प्रतिनिधी-

आई राजा उदो उदो' चा जयघोष करत हलगी,झांज, संबळ च्या गजरात शुक्रवारी येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुना वेचण्याचा मानाचा कार्यक्रम विधीवत पार पडला. चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेल्या या यात्रा काळात रखरखत्या उन्हातही जवळपास तेरा चौदा लाखांपेक्षा जास्त भाविकांनी येडाई च्या नगरीत यासाठी हजेरी लावली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे  येडाई नगरी भक्तिसगरात न्हाऊन निघाली.

 चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेल्या या यात्रा काळात रखरखत्या उन्हातही जवळपास तेरा चौदा लाखांपेक्षा जास्त भाविकांनी येडाई च्या नगरीत चुनखडी वेचण्यासाठी हजेरी लावली होती.

महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवी चा यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान पार पडतो.दरवर्षी प्रमाणे  येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. श्री येडेश्वरी देवीलाच महाराष्ट्रामध्ये येडेश्वरी चे भक्त येडाई या नावानेही संबोधतात. ही यात्रा पाच दिवसाची असून यात्रा उत्सवातील चुना वेचण्याचा प्रमुख व मानाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यानिमित्त बुधवार गुरुवार पासूनच येरमाळा येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही देवीचे भक्त येरमाळा नगरीत दाखल होत होते.

आई राजा उदो उदो.... आई येडेसरूच उद् उद ...

चा भक्तिभावे जयघोष करत आई येडेश्वरी च्या येरमाळा येथील चैत्र यात्रेसाठी सुमारे चाौदा लाख भाविकांनी चुन्याचा रानात हजेरी लावली. हर्ष उल्हासात आणि भक्तिभावाने चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या दरम्यान उदो उदो च्या गजरात येडाई मातेच्या पालखीचे आमराईत आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली.भक्तीची ही ओघ आणखीन चार दिवस राहणार आहे.

 येडेश्वरी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या मुख्य दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मुख्य मंदिरातून मातेच्या पालखीचे अमराई कडे प्रस्थान झाले. यावेळी लाखो भाविकांची उपस्थिती होती. मंदिरापासून ते अमराई पर्यंत हलगी, झांज,  संबळाच्या तालावर व आई राजा उदो उदो च्या नामघोषाने संपूर्ण येरमाळा नगरी दुमदुमून गेली होती. सकाळी 10 वाजण्या च्या जवळपास गावातील  बाजार चौकात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पालखी मार्गावर काढलेल्या रांगोळी वरून मातेच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी गावातील मान्यवर मंडळी बरोबरच नेतेमंडळी यांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर हनुमान मंदिर चौकातून ११:४५ वाजण्याच्या सुमारास पालखीचे चुनखडीच्या रानात आगमन झाले. याठिकाणी असलेल्या येडेश्वरी मातेच्या ठाण असलेल्या ठिकाणी पोहचली. यावेळी पालखी दर्शनासाठी व  वेचलेली चुनखडी पालखीवर टाकण्यासाठी लोकांचा लाखोंच्या वर जनसागर लोटला होता. यावेळी आमदार राणाजगजीतसिहं पाटील यांच्या सहकार्यातून पालखी वर हेलिकॅप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.


 
Top