धाराशिव  / प्रतिनिधी-

 विकासाची दृष्टी असेल तरच गावचा विकास होईल. त्यामुळे गावाचा विकास करायचा असेल तर योग्य व्यक्तीला निवडून दिले पाहिजे,  असे प्रतिपादन पाटोदा (जि. छत्रपती संभाजीनगर) चे आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

 रूपामाता उद्योग समूहाच्या वतीने धाराशिव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवारी (दि.9) जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी 'सक्षम लोकप्रतिनिधी व ग्रामविकास' या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी  जिजाऊ भूषण ग्रामीण उद्योजिका तथा महिला बचत गट प्रणेत्या सौ. सीताबाई मोहिते, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड गुरुजी, रुपामाता समूहाचे संस्थापक ॲड.व्यंकटराव गुंड, कार्यकारी संचालक

ॲड.अजित गुंड, ॲड.अनिल काळे, ॲड.अजित खोत, ॲड.नितीन भोसले, दादा ज्ञानदेव राजगुरू, दत्तात्रय सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पुढे बोलताना श्री. पेरे पाटील म्हणाले की, आजच्या काळात जनतेला काय करावे आणि काय करू नये हे शिकवण्याऐवजी त्यांना पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. लोकांना पर्याय असेल तेव्हा त्यांना स्वच्छता, पाण्याचा काटकसरीने वापर अशा गोष्टींची जाणीव होईल. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील आधुनिक भारत घडवायचा असेल तर सरपंच आणि ग्रामसेवकांनी समन्वयाने काम करावे.  गावच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती गावागावात पहायला मिळतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण जगातील बावीस देशामध्ये जाऊन आलो. तिथल्या आणि आपल्या देशात खूप मोठा फरक आहे. आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. गावाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शुद्ध पाणी व झाडे मोठ्या प्रमाणात लावावी, असा संदेश त्यांनी दिला.

  प्रारंभी कै.विश्वनाथ गुंड व कै. सौ.रुपामाता गुंड यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. रूपामाता समूहाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 प्रास्ताविकात रुपामाता समूहाचे संस्थापक ॲड.व्यंकटराव गुंड यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश विशद करून रूपामाता समूहाच्या वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली. 2003 साली अल्पशा भागभांडवलावर सुरू झालेल्या समूहाने सहकार, उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. बँकिंग, दुध डेअरी प्रॉडक्ट्स, पशु आहार उत्पादन, गूळ पावडर कारखाना अशा विविध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मनसुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद खांडेकर, सत्यनारायण बोधले, बिभीषण माने, तुषार पाटील, संजय भिसे, हर्षल मोहिते आदींनी  परिश्रम घेतले. कार्यशाळेस धाराशिव जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 
Top