धाराशिव  / प्रतिनिधी-

 पत्रकारांचे प्रश्न शासन व प्रशासन दरबारी मांडून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बीड येथे वाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांचे पहिलेच विभागीय अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनास मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहणार असून यासाठी एक हजार पत्रकार सहभागी होणार असल्याची माहिती व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा या अधिवेशनाचे विभागीय निमंत्रक संजय मालाणी यांनी दि.९ एप्रिल रोजी दिली.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, बीड जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर धांडे, अमोल जाधव, परभणीचे महेश देशमुख, धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे आदी उपस्थित होते. हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकारांची दि.३० एप्रिल रोजी बीड येथे विभागीय अधिवेशन घेण्यात येणार आहे.  पुढे बोलताना मालाणी म्हणाले की, व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून बीड येथे दि.३० एप्रिल रोजी विभागीय अधिवेशन घेण्यात येणार असून पत्रकार सर्वांचे प्रश्न आपल्या लेखणीतून मांडून त्यास न्याय देण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्याच पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी वाईस ऑफ मीडिया ही संघटना देशभरात कार्यरत झाले असून या संघटनेचे २८ हजार ५०० सदस्य झालेले आहेत. त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य, पाल्यांसाठी शैक्षणिक सोयी-सुविधा, पत्रकारांसाठी घरे, पत्रकारांच्या पाल्यांना नोकरी आदी विविध प्रश्न शासन व प्रशासन दरबारी मांडून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या विंगची स्थापना करण्यात आली असून या सर्व विंग कार्यरत झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे बीड येथील अधिवेशन हे राज्याला आदर्श कसे होईल ? यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.‌ तर विजय चोरडिया म्हणाले की, पत्रकारांच्या अनेक संघटना होऊन गेल्या. परंतू प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. पत्रकारांची संघटन होणे आवश्यक असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकारांची शंभर घरे करण्याचे उद्दिष्ट असून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राज्यातील १० हजार पत्रकारांना आरोग्य कार्ड देण्यात येणार असून पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी शासनाच्या अटींमध्ये शिथिलता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे पत्रकारांच्या पाल्यांचे विदेशात शिक्षण करण्यासाठी मार्गदर्शन व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे यशस्वी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविक ओंकार बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन कार्याध्यक्ष रहीम शेख यांनी व उपस्थितांचे आभार प्रसिद्धीप्रमुख शितल वाघमारे यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top