धाराशिव / प्रतिनिधी-

 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गरजूंना मोफत विधी सेवा देण्यासाठी विधी सहाय्यक संरक्षण सल्लागार (एलएडीसीएस) ही योजना सुरू केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

 दुर्बलांना व गरजू कैदयांना नि: शुल्क सेवा :

 सर्वसामान्य नागरिक, आर्थिकदृष्टया दुर्बल आणि कारागृहातील गरजू कैदयांना उत्कृष्ट सेवेची हमी आणि नि: शुल्क सेवा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्हयात तसेच पूर्वी हे काम उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत केले जात होते.

   आता या नवीन योजनेच्या कामकाजासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आणि उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अंजू एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाच्या न्याय संकुल, नवीन इमारतीमधील पहिल्या मजल्यावर 'लोक अभिरक्षक' कार्यालय स्थापन करण्यात आले असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, श्री. वसंत यादव यांनी दिली.

    उस्मानाबाद जिल्हयात वर्षभर प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविल्यानंतर आता महाराष्ट्रातील २८ जिल्हयांमध्ये अंमलबजावणीसाठी 'लोक अभिरक्षक' कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या योजनेची माहिती कारागृह, सर्व पोलिस ठाणे, बालसुधारगृह आदी विविध ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू पक्षकारांनी घ्यावा. असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वसंत यादव यांनी केले आहे.

 07 निष्णात विधिज्ञांनची निवड

  लोक अभिरक्षक कार्यालयाच्या समितीमार्फत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 07 निष्णात विधिज्ञांची निवड केली आहे. त्यामध्ये मुख्य विधी सहाय्यक संरक्षण विधिज्ञ म्हणून अॅड. अमोल गुंड तसेच दोन उपमुख्य विधी सहाय्यक संरक्षण विधिज्ञ आणि अॅड. श्री. अभय पाथरूडकर, ॲड. श्री. गोरख कसपटे व तसेच चार विधी सहाय्यक अॅड. श्री. शुभम गाडे, अॅड. कु. विशाखा बंग, श्रीमती. अॅड. मोहिनी शिरूरे, अॅड. श्री. शशांक गरड या सर्व विधी सहाय्यक संरक्षण विधिज्ञांचा समावेश आहे.

 पुढील सेवा प्रदान केल्या जातील:

   लोक अभिरक्षक कार्यालयाला भेट देणाऱ्या व्यक्तीनां कायदेशीर सल्ला व साहाय्य, पोलिसांकडून अटक होण्यापासून ते विशेषतः कारागृहातील गरजू कैदयांची फौजदारी प्रकरणे चालविणे, अपील दाखल करणे,जामीन करणे,कथित गुन्हयाच्या ठिकाणी / क्षेत्राला भेट देणे, कुटुंबाशी चर्चा करणे.


 
Top