धाराशिव / प्रतिनिधी-

 केंद्र शासनाच्या दिव्यागांना सहाय्यक उपकरणे योजना जिल्ह्यात राबविताना  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह संबंधित मंत्र्यांचा बॅनरवर फोटो किंवा नामोल्लेख टाळला आहे.   विशेष म्हणजे हा कार्यक्रम प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असताना त्यांचा नामांक टाळणाऱ्या मंडळीचे कृत्य म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी असल्याची टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शिवसेना (ठाकरे गट ) खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर सोडले आहे.

 केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ. विरेन्द्र कुमार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो व नामोल्लेख डिजिटल बॅनर व सोशल मिडीयावर प्रदर्शित न करणाऱ्या संबंधित संस्था व लोकप्रतिनिधींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दिव्यागांना सहाय्यक उपकरणे (ADIP) या केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव साहित्य वाटप करण्यासाठी दि.१८ ते २४ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे. ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. तर राज्यात समाजिन न्याय आणि विशेष सहाय्य विभाग याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अथवा जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना या विशेष योजनेसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या शिबिरासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया ही शासकीय यंतानेमार्फत राबविली जाते. यासाठी लागणारा खर्च व नियोजन जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व पंचायत समिति स्तरावर करण्यात आले आहे. या शिबिराची माहिती सामान्य जनतेस व्हावी यासाठी जाहिराती देत असताना शिष्टाचार (प्रोटोकॉल) पळायचा असतो. त्याचे पूर्णतः उल्लंघन झालेले निदर्शनास येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. स्थानिक ठिकाणी व सोशल मीडियामध्ये प्रसारित झालेल्या जाहिराती पाहता खास करून संबंध नसलेल्या संस्थेचे नाव व विशेष पक्षांच्या लोकांचे फोटो वापरुन जनमानसात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  वास्तविक शासनाच्या नियमानुसार व शिष्टाचार (प्रोटोकॉल) नुसार ज्या विभागाची योजना आहे. त्या-त्या विभागाच्या प्रमुखांचा उल्लेख व फोटो जाहिरातीमध्ये असणे अभिप्रेत आहे.  केंद्र शासनाच्या मदतीने ते गरजू जनतेसाठी विविध योजना राबवितात. अशा प्रसंगी राजकीय आकसापोटी स्थानिक लोकप्रतिनिधी शासनाच्या योजना शासनाच्या पैशाने स्वतःच्या असल्यासारख्या वापरत असल्याचा गंभीर आरोप करून हे शासकीय नियमानुसार योग्य नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या दिव्यागांना सहाय्यक उपकरणे योजना जिल्ह्यात राबविताना जाणीवपूर्वक प्रधानमंत्री मोदी, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ. कुमार,  मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो व नामोल्लेख डिजिटल बॅनर व सोशल मिडीयावर प्रदर्शित न करणाऱ्या संबंधित संस्था व लोकप्रतिनिधींची चौकशी करून दोषींवर तसेच या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे.

 यावेळी भाजुयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, माजी गटनेते युवराज नळे,अभय इंगळे, दत्ता पेठे, बापू पवार,ओम नाईकवाडी, प्रमोद पाटील, हिंमत भोसले, संदीप इंगळे, रोहित देशमुख, सुनील पंगुडवले,पोपट नाईकवाडी, सागर दंडनाईक,राजाभाऊ कारंडे,प्रसाद मुंडे आदी उपस्थित होते.


 
Top