अक्षय तृतीया,रमजान ईद, बसवेश्वर जयंती, परशुराम जयंती , वंसुधरा दिन उत्साहात साजरा 

धाराशिव / प्रतिनिधी-

 हिंदूंचा अक्षय तृतीया सण, मुस्लिम बांधवांचा रमजान ईद त्याचबरोबर मानव- तेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर व परशुराम जयंती व वसुंधरा दिन  जिल्हाभरात शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एकमेकांच्या गळाभेटी घेवून ईद व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देवून आमरस, शिरखुर्मा, भजे, गुलगुल्यांचा आस्वाद घेत जिल्हावासीयांनी एकमेकांच्या सण समारंभात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. यामुळे शनिवारचा दिवस सुवर्णमयी दिवस ठरला. 

रमजान महिन्यात मुस्लिम समाजबांधवांनी रोजा (उपवास) करून अल्लाहकडे प्रार्थना केली. रमजान महिन्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी रमजान ईद सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. शहरातील दर्गाह मैदान, ईदगाह मैदान येथे खा.ओमराजे निंबाळकर , आ.कैलास पाटील भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील , प्रशांत पाटील, अग्निवेष शिंदे, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, यांच्यासह विविध पक्ष, संघटनांसह विविध संस्था, संघटनांच्यावतीने मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देवून, गळाभेट घेवून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त सुक्या मेव्यापासून बनविलेले विविध पदार्थ, भजे व इतर पदार्थांची मेजवानी आप्तस्वकियांना दिली.

अक्षय तृतीया सणानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांनी घरोघरी आमरस, पुरणपोळी व अन्य पदार्थांची मेजवानी दिली. रमजान ईद व अक्षय तृतीया एकाच दिवशी आल्याने हिंदू-मुस्लिम बांधवांनी दोन्ही सण एकत्र येत साजरे केले. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाजबांधवांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. एकंदरीत हे चारही सण, जयंतीउत्सव ऐक्याने साजरे झाले.


 
Top