धाराशिव/प्रतिनिधी-

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट होवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ प्रशासनामार्फत पंचनामे करावेत. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी रविवारी (दि.९) जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील कळंब, धाराशिव, वाशी, तुळजापूर, उमरगा या तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे विद्युत प्रवाह बंद करुन काम करण्यासाठी विद्युत पोलवर चढलेल्या एकूरगा येथील विकास जनक घोगरे (वय ३८) या शेतकऱ्याचा अचानक वादळी वाऱ्यामुळे शॉटसर्कीट होवून मृत्यू झाला. तर जिल्ह्यात एकूण ८ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला असून पशुपालक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कळंब तालुक्यातील लोहटा पुर्व, कोथळा, करंजकल्ला, हिंगणगाव, दाभा, शिराढोण, आवाड शिरपूरा, सौंदना आंबा, घारगाव, रांजणी, लासरा आदी गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. वाशी तालुक्यातील पारा, फाक्राबाद, डोंगरेवाडी आदी गावात, धाराशिव तालुक्यात धारुर, वाडी बामणी, केशेगाव, उंबरेगव्हाण, ताकविकी या ठिकाणी गारपीट झाली तर ढोकी, तडवळा, येडशी ज्वारीचे कोठार असलेल्या शेतीतील ज्वारी, गहू यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तुळजापूर तालुक्यात मोर्डा, काक्रंबा आदी गावात धुव्वॉंधार पाउस झाला. उमरगा तालुक्यात कुन्हाळी, हिप्परगा रवा, नाईचाकूर याठिकाणी वादळी वाºयासह मोठ्या प्रमाणात पाउस पडून गहु, ज्वारी, हरभरा या पिकासह फळबागांचे नुकसान झाले आहे.

गारपीट व मोठ्या प्रमाणात पाउस झाल्यामुळे लहान अवस्थेतील उस पिकांचेही पाने गळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे उस पिकाचेही ताबडतोब पंचनामे व्हावेत, जिल्ह्यात अवकाळी व गारपीट होवून ज्या-ज्या भागात जिवित व वित्तहानी झाली. त्याचे तात्काळ पंचनामे व्हावेत, व त्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी विनंती दुधगावकर यांनी केली आहे.

 
Top