धाराशिव/प्रतिनिधी -

राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी बुधवारी विधान भवनाच्या पायर्‍यावर आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधले. हरभरा खरेदी केंद्रांना जाणीवपूर्वक मंजुरी दिली जात नसल्याचा आरोप करत हे सरकार शेतकर्‍यांसाठी आहे की व्यापार्‍यांसाठी? असा सवाल आ.पाटील यांनी केला.


राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे खरेदी केंद्राची संख्या वाढविण्याची मागणी होत असताना शासनाने जाणीवपूर्वक केंद्रांना मंजुरी दिलेली नाही. तर मंजुरी मिळालेल्या केंद्रापैकी अनेक केंद्रावर अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. एकीकडे बाजारभाव आणि हमीभावामध्ये एक ते दीड हजार रुपयांची तफावत असल्याने शेतकर्‍यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. धाराशिव जिल्ह्यात 49 खरेदी केंद्राची मागणी केली असताना केवळ 18 केंद्रास मंजुरी दिले आहे. या केंद्रामार्फत नोंदणी सुरू झाली असली तरी एकाही केंद्रात प्रत्यक्ष खरेदी सरू झालेली नाही. ज्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे हाल झाले तशीच हरभरा उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था सरकारला करायची आहे काय? व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचा हरभरा कवडीमोल दराने खरेदी केल्यावर केंद्रामार्फत खरेदी करणार काय? असा सवालही त्यांनी केला. सरकारने कागदोपत्री नोंदणी करुन उपयोग नाही. उद्यापासूनच हरभरा खरेदी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभुराज देसाई यांनी आ.पाटील यांच्यासह ,आ राहुल पाटील,आ आमशा पाडवी ,आ संजय जगताप यांच्याशी चर्चा करुन हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले.

 
Top