धाराशिव/प्रतिनिधी -

भोगवाटदार वर्ग २ करण्यात आलेल्या इनामी जमिनी नियमानुकूल करून वर्ग १ मध्ये परावर्तीत करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने महसूल मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार दि. ०९ मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनीची ७ अ / १२ ब वरील भोगवाटदार वर्ग १ असलेली नोंद संबंधितांची सुनावणी न घेता वर्ग २ मध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत. सदर जमिनी नियमाणुकूल करण्यासाठी ५०% नजराणा शुल्क व शर्थ भंग म्हणून २५% दंड रक्कम भरावी लागणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या या कार्यवाहीला स्थगिती देण्याची व याबाबत बैठक घेण्याची विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने दि. ०७/०२/२०२३ रोजी मा. महसूल मंत्री यांनी स्थगिती आदेश दिले होते व लवकरच याबाबत बैठक घेण्याचे मान्य केले होते.

वर्ग २ जमिनी नियमानुकूलित करण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढा मोठा दंड भरणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे सदरील बैठक लवकरात लवकर घेवून सर्वसामान्यांना दिलासादायक निर्णय घ्यावा तसेच सीलिंग जमिनी नियमानुकूल करण्यासाठी दंड भरण्याच्या नोटिसा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना दिल्या आहेत, हा विषय देखील या बैठकीत घ्यावा, यासाठी काल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. या अनुषंगाने इनामी जमिनी नियमानुकूल करण्याबाबत व सीलिंग जमिनी बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने दि. ०९/०३/२०२३ रोजी बैठक घेण्याचे ठरले असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

यावेळी बार्शीचे आमदार    राजाभाऊ राऊत यांच्यासह धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष  नितीन काळे उपस्थित होते.

 
Top