धाराशिव / प्रतिनिधी-

 हिंदू नववर्षाचे स्वागत व चैत्र गुढी पाडव्यानिमित्त आगामी श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरात राष्ट्र सेविका समितीच्या वतीने राम प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी सात वाजता शहरातील समता नगर मधील श्री दत्त मंदिरा समोर  भगवान श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन करून या राम प्रभातफेरीचा शुभारंभ करण्यात आला. 

राष्ट्र सेविका समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात या राम प्रभातफेरीचे एकाच वेळी आयोजन करण्यात आले होते. धाराशिव शहरातील महिला भगिनी पारंपारिक वेशभूषेत या राम प्रभातफेरीत मोठया संख्येने  सहभागी झाल्या होत्या. अग्रभागी प्रभू श्रीराम ,  जानकी (सीता) व लक्ष्मणाच्या रूपात लहान बालके या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. शहरातील समता नगर येथून सुरू झालेली ही प्रभातफेरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे काळा मारुती चौक ,  माऊली चौक,  नेहरू चौक मार्गे शहरातील कसबा येथील श्रीराम मंदिरापर्यत काढण्यात आली. या प्रभात फेरीच्या मार्गावर विविध ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या यावेळी प्रभात फेरीवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. प्रभातफेरीतील सहभागी महिलांनी "  प्रभू श्रीराम चंद्र की जय , "  भारत माता की जय " काश्मीर हो या गोहाटी अपना देश अपनी माटी "  हिंदू वाणी में ओज हो ,  राम जैसा तेज हो "  अशा विविध घोषणा दिल्या व श्रीराम गीत गायन केले यामध्ये महिला भजनी मंडळ देखील सहभागी झाले होते . शहरातील कसबा येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाची महाआरती करून या राम प्रभातफेरीची सांगता करण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये राष्ट्रसेविका समितीच्या जिल्हा कार्यवाहिका सौ. सुरेखा धोत्रीकर व सौ. प्रज्ञा महाजन शहर कार्यवाहिका यांच्यासह असंख्य महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या .

 
Top