धाराशिव / प्रतिनिधी-

 जनता दरबाराचा उद्देश अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरण सर्व विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थिती निकाली काढण्याचा असून शासन थेट जनतेच्या दारी आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज भूम येथे केले. येथील तहसील कार्यालयाच्या आवारात भूम तालुक्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बोलत होते.

 यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार उषाकिरण श्रंगारे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके आदी उपस्थित होते.

 तालुक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक कामांसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयी येणे गरजेचे असते. परंतु काही कारणास्तव ग्रामस्थांना अडचणी येतात आणि त्याची प्रशासकीय आणि शासकीय कामे प्रलंबित राहून जातात. अशा ग्रामीण बांधवांची कामे गतिमान आणि पारदर्शकपणे  करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एकत्रित करण्यात आले आहेत. जनतेच्या तक्रार अर्ज स्वीकारून  15 एप्रिल पर्यंत अनुपालन अहवाल सादर करावेत असेही पालकमंत्री  म्हणाले.

 पुढे पालकमंत्री म्हणाले की, जनतेने नोंदविलेल्या तक्रारींचे निराकरण, निवारण करण्यासाठी संबंधित विभागाच्या प्रमुखास जबाबदार ठरविण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी अतिशय शिस्तीने या जनता दरबारात आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करावी. तसेच काही प्रकरणांत अधिक वेळ लागू शकतो. अशा प्रकरणांमध्ये अनुपालनास विलंब होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी जनतेला न्याय देण्याच्या धोरणातून अधिक वेळ घेतला तरी चालेल पण काम पूर्ण करणे आवश्यक आहे. भूमच्या जनतेच्या  प्रश्नाचे निराकरण हा उद्देश समोर ठेवून आजचा दरबार काम करत आहे असेही डॉ. सावंत म्हणाले.

 यावेळी पालकमंत्री आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते 2021 मध्ये कोरोना योध्दा विशाल बनसोडे आणि दिलीप रामचंद्र ढेरे यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. कर्तव्य बजावत असताना या योध्याचा मृत्यु झाला होता. त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये अर्थसहाय्यचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेतील 7 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आल्याचे प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.

 भूम तालुक्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेअंतर्गत 300 शेततळे मंजूर झाले असून यामुळे भूम तालुका टँकरमुक्त होईल अशी आशाही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. या जनता दरबारात भूम तालुक्यातील महिला वृध्द आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top