धाराशिव / प्रतिनिधी-

हरभरा खरेदी केंद्र सूरु करण्याची वेळोवेळी मागणी करुनही अद्यापही फक्त निम्मेच केंद्र सूरु झाले आहेत, त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने व्यापाऱ्यानी घ्यावा व नंतर व्यापाऱ्याकडुन त्याची खरेदी करायची असल्याचे घणाघात आमदार कैलास पाटील यानी केला आहे.

हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असुन व्यापाऱ्यांची मात्र काळजी करत असल्याचे दुर्देवी चित्र तयार झाल्याची खंत आमदार पाटील यानी व्यक्त केली आहे.

यंदा हरभरा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेले होते, गेल्यावर्षी उत्पादकता कमी असतानाही खरेदी केंद्राची संख्या मोठी होती. शिवाय वेळेत सूरु होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित दर देखील मिळाला होता. यावेळी उत्पादकता वाढलेली असल्याने किमान 69 केंद्र सूरु व्हावी अशी मागणी केली होती, त्यानुसार पणन विभागाकडेही पाठपुरावा केला होता. पण केंद्र वेळेत सूरु न झाल्याने शेतकऱ्यांना आपला हरभरा व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागल्याचे चित्र आहे. मागणी केल्यानंतर अजुनही फक्त 25 ते 30 म्हणजे अपेक्षेपेक्षा फक्त निम्मेच केंद्र सूरु असल्याचे आमदार पाटील यानी म्हटले आहे. जे केंद्र सूरु झाले त्याना बारदाणाही वेळेत उपलब्ध केला जात नाही साहजिकच खरेदीची प्रक्रिया सुध्दा रेंगाळत राहवी अशी मानसिकता सरकारची असल्याचे आमदार पाटील यानी म्हटले आहे.जिल्हाधिकारी यानी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 29 लाख क्विंटल एवढे उत्पादन अपेक्षित असुन त्यापैकी आता केवळ दोन लाख क्विंटलची खरेदी होण्याची शक्यता असुन त्यामुळे किती मोठा फटका शेतकऱ्यांना बसला हे सर्वासमोर आहे. आता व्यापाऱ्यांकडे गेलेला हरभरा हमीभावाने सरकार खरेदी करणार ही निती शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळण्यासारखी असल्याचे आमदार पाटील यानी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार म्हणुन कोट्यावधीच्या जाहीराती कऱणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात व्यापाऱ्यांची काळजी दिसु लागल्याचे वास्तव आहे. अशा सरकारला शेतकरी वेळ आल्यावर त्यांचा हिसका दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास आमदार पाटील यानी व्यक्त केला.

 
Top