धाराशिव / प्रतिनिधी - सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे सरकार आले असा दावा करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना एप्रिल फुल केले आहे. सततच्या पावसाची नुकसान भरपाई ३१ मार्चपर्यंत देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते. नुकसान होऊन आता जवळपास सहा महिने होत आले तरीही सरकारने शेतकऱ्यांना दमडीदेखील दिली नाही.त्यामुळे आश्वासनाची तारीख न पाळणार्‍या सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केल्याने हे सरकार शेतकर्‍यांना एप्रिल फुल बनवत असल्याचे कैलास पाटील यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठीचे ढोंगी प्रेम दाखविणार्‍या सरकारचा खरा चेहरा आता समोर आल्याचे आमदार पाटील यानी म्हटले आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यात सततच्या पावसाने शेतीपिकाचे आतोनात नुकसान झाले. पंचनामे झाले त्यावरुन जिल्ह्याला 222 कोटी रुपये मदत मिळण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यानी दिले होते. त्याचा प्रस्ताव 30 ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आला पण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यासही विलंब झाला जेव्हा बैठक झाली ती देखील निष्फळ ठरली. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन सततच्या पावसाचे निकष आणि व्याख्या निश्चित करुन अभ्यास गट नेमण्याची  भुमिका सरकारच्याच वित्त विभागाने घेतली. शेतकऱ्यांचे सरकार म्हणणार्‍या मुख्यमंत्र्याना शेतकऱ्यांसाठी मदत देताना निकष ठरवायची वेळ का येते असा प्रश्नही आमदार पाटील यानी उपस्थित केला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आता दुसरे अधिवेशन देखील पार पडले त्यातही बोलताना मुख्यमंत्री 31 मार्चपर्यंत मदत देणार असल्याचे सभागृहातच म्हणाले होते. आज ती मुदत संपतान‍ा एप्रिलचा पहिला दिवस उजाडत आहे. मग तो दिवस एप्रिल फुल म्हणुन साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी सुध्दा सरकारने हाच दिवस दाखवला व त्याना एप्रिल फुल बनविल्याचे त्यांना दाखवायचे होते.  सततच्या पावसाच्या नुकसानीचे निकष ठरलेले नसताना ७५५ कोटी रुपये सरकार वितरित करते.मग आताच निकष, व्याख्या, तांत्रिक शुध्दता ठरविण्याचा विचार मनात का येतो? एकाच गोष्टीसाठी दोन वेगळे नियम कसे असे प्रश्न आमदार पाटील यानी उपस्थित केले. मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी करायची तर दुसऱ्या बाजुला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ विभाग सांभाळताना विरोधी भुमिका घेण्याचा डाव खेळतात. तुमच्या दोघांच्या खेळात आमचा शेतकरी मात्र भरडुन जात असल्याचा घणाघात  आमदार पाटील यानी केला आहे. सरकार तर शेतकरी विरोधी आहे हे सिध्द झालेच आहे. शेतकऱ्यांच्याही ते लक्षात आले असुन शेतकऱ्यांसाठी सभागृहात कोट्यावधीच्या घोषणा करायच्या. प्रत्यक्षात द्यायची वेळ आली की थातुर मातुर कारणे पुढे करत सरकार ढोंगीपणा करत असल्याचे  आमदार पाटील यानी यावेळी व्यक्त केले आहे. 

 
Top