धाराशिव/प्रतिनिधी -

श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या टप्प्यातील १,००० कोटी रुपयांच्या तुळजापूर प्रारूप विकास आराखड्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून जनतेसमोर सादरीकरण करण्यात आले.

 


श्री क्षेत्र तुळजापूर विकासाचा रु. १००० कोटीचा पहिल्या टप्याचा  प्रारुप  विकास आराखडा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गुरुवार दि. ३० रोजी सांयकाळी मंदीर महाद्वारासमोर शहरवासीय, भाविक भक्त व व्यापाऱ्यांसमोर  सादर केला. सर्व भक्तांनी मिळून बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असून आई तुळजाभवानीची सेवा करण्याची ही अद्वितीय संधी असल्याचे सांगत तुळजापूर विकास आराखड्याचे जनतेसमोर सादरीकरण करतानाचे क्षण आपल्या आयुष्यातील अभूतपूर्व व अविस्मरणीय असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हा आराखडा पुढील २५ वर्षाच्या गरजा लक्षात घेवुन तयार करण्यात आला आहे. कुणालाही  विस्थापीत न करण्याचा यात प्रयत्न केला गेला असुन गरज पडलीच तर चार पाच ठिकाणी तेथील नागरिकांशी चर्चा करुन त्यांना विश्वासात घेवून तिर्थक्षेञ तुळजापूर विकास आराखडा राबविण्याचा मानस असल्याची ग्वाही दिली.

या प्रारुप विकास आराखडाचा पहिला टप्पा हा मंदीर परिसर असुन तिर्थक्षेञ तुळजापूर कडे येणारे व मंदीर परिसरातील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. श्री तुळजाभवानी मंदीर प्रवेशद्वार नव्याने प्रस्तावीत करण्यात आले आहे. तसेच मुख्य मंदीर गर्भगृह, मंदीर शिखर व परिसर, तिर्थकुंड, धार्मिक विधी, वाहनतळ, दर्शन मंडप थांबे, बाहेर पडण्याचा मार्ग याचा समावेश आहे. तसेच तिर्थक्षेञ परिसरातील अती प्राचीन तिर्थकुंडांचे  संवर्धन यात केले जाणार आहे. गर्दी व्यवस्थापन व नियोजनावर भर देण्यात आला आहे. मंदीर महाद्वारा समोरच्या बाजार पेठेतील दुकाने एकसारखी व ऐका रेषेत आणण्यात येणार आहेत.

दर्शनासाठी आँनलाईन बुकींग सोय असुन वाहनतळ येथेही दर्शन बुकिंग सोय करण्यात येणार आहे. मंदीरात अभिषेक, मुख दर्शन, पेड दर्शन, यासाठी स्वतंत्र हॉल व रांगाची सोय करण्यात आली आहे. बाहेर पडण्यासाठी तीन मार्ग प्रस्तावित केले आहेत. सध्याच्या गाभारा परिस्थितीत भाविकांना सुलभ दर्शनसाठी बदल करण्याचे नियोजन आहे. सौर उर्जेच्या माध्यमातून वीजेची गरज भागविण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.

सुमारे १० एकर जागेमध्ये आई तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे सुमारे १०८ फूट उंचीचे शिल्प तसेच उपलब्ध पुरातन वस्तु ठेवा जतन करण्यासाठी वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या पूर्ण जागेमध्ये बागबगीचा व ‘लाइट ॲण्ड साऊन्ड शो' विकसित करून आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. अद्यावत भव्य  नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. शहराच्या बाह्य भागात सर्वसुविधायुक्त वाहन तळे उभारण्यात येणार असुन येथे दर्शन बुकींग, विश्रांती भोजन अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हा विकास आराखडा इंटरनेट, सोशल मिडीया, व्होट्सअप वर उपलब्ध करुन दिला जाणार असून याबाबतीत काही सुचना अथवा तक्रारी असल्यास शनिवार व रविवारी त्या लेखी स्वरुपात मंदिर कार्यालयात सल्लागार यांच्याकडे द्याव्यात, असे आवाहन करत सदर विकास आराखडा संपूर्ण तुळजापूर नगरीचा कायापालट करणारा ठरणार असून या आराखड्याच्या निर्मितीसाठी आजवर सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आभार व्यक्त केले व यापुढे अधिक व्यापकरित्या सहभागाची गरज यावेळी व्यक्त केली.

 
Top