धाराशिव / प्रतिनिधी- 

सध्यस्थितीत राज्यात गोवर आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या आजाराच्या प्रतीबंधासाठी व माहे डिसेंबर २०२3 पर्यंत गोवर या आजाराचे दुरीकरण करण्याच्या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात दि. 15 ते 25 डिसेंबर 2022 पहिला टप्पा आणि दि.15 आणि 25 जानेवारी 2023 या कालावधीत दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे.

गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील समीकरण न झालेल्या बालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. या साठी ग्रामस्तरापासून लसीकरण न झालेल्या बालकांच्या याद्या स्थानिक आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत तयार करण्यात येऊन या बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी चार आठवड्याच्या अंतराने दोन मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा हा दि. 4 ते 10 मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 या मोहिमेचा उद्देश हा गोवर उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे, रुग्ण संख्या आणि मृत्यूवर नियंत्रण ठेवणे, सामूहिक प्रतिकार शक्ती वाढविणे असा आहे.  या मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी सांगितले की, साथीच्या पार्श्वभूमीवर आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येऊन नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार सूक्ष्म कृती नियोजन करून गोवर रुबेला लसीपासून वंचित लाभार्थ्यांचे मोहिमेच्या माध्यमातून देय असणारी लस देऊन गोवर रुबेला या आजारापासून संरक्षण करण्यात येऊन मोहीम 100 टक्के यशस्वी करण्याचे नियोजन आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी दिली.

 जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितले की, सध्या राज्यात गोवर साथ सुरु असल्याने गोवर सदृश लक्षणे जसे की, ताप व अंगावर पुरळ दिसून आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. तसेच संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळा तपासणी नंतर गोवर रुग्ण आढळ्यास समुदाय स्तरावर Active Case Search राबवून त्या भागात पुनःश्च सर्वे करणे, संशयित गोवर रुग्णांना दोन दिवस सलग वयोगटानुसार देय जीवनसत्व “अ” ची मात्रा देणे, इत्यादी कार्यवाही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. असे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितले.

 तरी समाजातील सर्व घटकांनी सजग राहून गोवर-रुबेला या आजाराचा उद्रेक होणार नाही, तसेच डिसेंबर 2023 अखेर गोवर रुबेला या आजाराचे दुरीकरण हे ध्येय ठेऊन समन्वयाने विशेष गोवर लसीकरण मोहीम यशस्वी करावी तसेच गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित बालकांच्या पालकांनी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे केले आहे.


 
Top