धाराशिव / प्रतिनिधी-
शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत श्रीक्षेत्र शिर्डी येथे (ता. राहता जि. अहमदनगर) येथे दि 24 ते 26 मार्च 2023 या कालावधीत महापशुधन एक्स्पो-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून 10 लाखापेक्षा जास्त पशुपालक व पशुप्रेमी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. या पशुप्रदर्शनास जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता व पशुसंवर्धन विभाग यांनी केले आहे.
हे प्रदर्शन 46 एक्कर विस्तीर्ण जागेवर होणार असून यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातील जातिवंत पशुधन (गायी, म्हशी, शेळी, मेंढी, कोंबडी, वराह, श्वान, अश्व इ) सहभागी होणार आहे. 500 हून अधिक स्टॉल या प्रदर्शनामध्ये लावण्यात येणार असून धाराशिवचा एक स्टॉल सदर प्रदर्शनामध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील पसरटे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी यांनी दिली.
या प्रदर्शनामध्ये पशुपालकासाठी विविध तांत्रिक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. तसेच या प्रदर्शनामध्ये पशुसंवर्धन विषयक विविध योजनाचे सादरकीकरण केले जाणार आहे. विविध प्रकारची 18 चारापिके व बियाणांची वैशिष्टे सदर प्रदर्शनामध्ये सादर करण्यात येणार आहेत. सदर प्रदर्शन हे पशुपालकासाठी अत्यंत उपयुक्त असून या प्रदर्शनातून पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्र्तोक्त्त पद्धतीने पशुपक्षी व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे.