धाराशिव / प्रतिनिधी-

 संमत्तीपत्राद्वारे शेतजमिनीची खातेफोड करून फेरफार मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडून 10 हजाराची लाच घेताना तुळजापूर तालुक्यातील सावरगाव सज्जाचा तलाठी रवींद्र दत्तात्रय अंदाने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी (दि.2) मार्च रोजी सायंकाळी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास सावरगाव येथील तलाठी कार्यालयात केली. लाचखोर तलाठ्याला पोलीसांनी अटक केली असून तामलवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकºयांने तुळजापूर तालुक्यातील सावरगाव सज्जाचे तलाठी रवींद्र दत्तात्रय अंदाने यांच्याकडे संमत्तीपत्राद्वारे शेतजमिनीची खातेफोड करून पत्नी व मुलाच्या नावे जमिन करण्यासाठी अर्ज दिला होता. तलाठी रवींद्र अंदाने यांनी या कामासाठी 15 हजार रूपये लाचेची मागणी करून 10 हजार रूपयात हे काम करण्याची हमी दिली होती. परंतु तक्रारदार शेतकºयाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने गुरूवारी सापळा रचला होता. सावरगाव येथील तलाठी कार्यालयात शेतकºयाकडून 10 हजाराची लाच घेताना तलाठी अंदाने यांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कारवाई केलेल्या पथकामध्ये पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, श्री. शेख, विष्णू बेळे, झाकीर काझी आदींनी केली.

 
Top