धाराशिव / प्रतिनिधी

 विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना द्रोणाचार्यासारखे वर्तन न ठेवता गुरुदेव कार्यकर्त्यांनी ज्ञानदानाचे कार्य करावे, ज्ञानदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. आपला विद्यार्थी विवेकानंदासारखा तेजस्वी कसा होईल याकडे लक्ष द्यावे.हा सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना बापूजींनी दिलेला मूलमंत्र होता.असे प्रतिपादन प्रा.आनंद जाधव यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेत केले.

  सदर व्याख्यानमाला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.      सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.यावेळी ते म्हणाले की, उद्याची पिढी सक्षम, सुसंस्कृत आणि विवेकानंदांसारखी तेजस्वी तयार होण्यासाठी, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य उद्याच्या तरुण पिढीला समजणे गरजेचे आहे. म्हणून या व्याख्यानमालेसाठी विद्यापीठात प्रयत्न करून ही व्याख्यानमाला विद्यापीठ स्तरावर सुरू व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आम्हाला यश मिळाले. आणि पहिलीच व्याख्यानमाला आमच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला मिळाली. या व्याख्यानमालेचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्की होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य श्री नानासाहेब पाटील हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नानासाहेब पाटील यांनी महाविद्यालयाची सुरुवात अनाथ आश्रमातून झाली आणि आज त्याचा खूप मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे. हे पाहताना मनाला समाधान वाटते. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या शिक्षणाच्या सोयी तयार होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या या अथक प्रयत्नातून आज सर्व प्रकारचे शिक्षण या महाविद्यालयात मिळत आहे असे ते म्हणाले.     कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. राजा जगताप यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले,तर आभार डॉ. केशव क्षीरसागर यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील अनेक सेवानिवृत्त प्राध्यापकांनी हजेरी लावली होती. महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजीराव गायकवाड आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.  सदर तीन दिवसीय व्याख्यानमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपन्न झाली.

 
Top