धाराशिव / प्रतिनिधी-
 सेंद्रिय शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव शहरात ऑरगॅनिक मॉल उभारण्याचा संकल्प धाराशिव जिल्हा सेंद्रिय शेती समितीच्या बैठकीत करण्यात आला. विशेष म्हणजे ही बैठक पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने घेण्यात आल्यामुळे सेंद्रीय शेती उत्पादकात समाधान मानले जात आहे. 
 धाराशिव येथे सेंद्रिय शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक  जिल्हा पोलिस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये सेंद्रिय शेती प्रचार, प्रसार, प्रशिक्षण, शास्त्रीय सेंद्रिय शेती तंत्रज्ञान, उत्पादन, प्रमाणीकरण, प्रक्रिया, मुल्यवर्धन आणि विक्री नियोजनासाठी,  धाराशिव जिल्ह्याचा स्वतंत्र ब्रँड आणि शहरात एक ऑरगॅनिक मॉल उभारण्याबाबत चर्चा झाली. 
 बैठकीत पुढील कृषी हंगामाकरिता  जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानी तयार केलेल्या सेंद्रिय परसबाग आणि  औषधी वनस्पतीचे नक्षत्र गार्डन तसेच पोलीस ग्राउंड येथे ग्रीन जॉगिंग ट्रॅक आणि मियावाकी (सघन) गार्डनला भेट देऊन पाहणी करण्यात आली.
 यावेळी सेंद्रियशेती क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणाऱ्या विविध शेतकरी आणि संस्था, कृषी विभागाचे प्रतिनिधी तसेच   जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, भूम, परांडा, वाशी, कळंब, लोहारा, उमरगा या सर्व तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि विविध पध्दतीने सेंद्रिय शेती आणि या क्षेत्रात काम करणारे शेतकरी उपस्थित होते.

 
Top