धाराशिव / प्रतिनिधी-

 "आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर धाराशिव" हे स्वप्न साकार करण्यासाठी व जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात खऱ्या अर्थाने वाढ करण्यासाठी येथील युवकांना छोटे मोठे उद्योग व शेती पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान राबवून २५ ते ३५ टक्के अनुदान असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून युवकांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून धाराशिव जिल्हा यात अग्रेसर असून प्रथमत: च शासनाने जिल्ह्यासाठी ठेवलेले उदिष्ट पूर्णंत्वाकडे जात आहे. या योजनांच्या माध्यमातून युवकांना होत असलेला फायदा व त्यांचा उत्साह पुढील कार्याला ऊर्जा व बळ देणारा असल्याची भावना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली असून यापुढे अजून ताकतीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

 देशाचे पंतप्रधान  नरेंद्र  मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत; आत्मनिर्भर धाराशिव’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार ‍निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नोंदणी केलेल्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यापासुन कर्ज मंजुरी पर्यंत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे.

 जिल्हयातील युवकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी अथवा चालु व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी या योजनांच्या माध्यमातुन अनुदानासह कर्ज स्वरुपात भांडवल उपलब्ध करुन दिले जाते. बुथ तेथे उद्योजक या संकल्पनेतुन जिल्हयात अनेक मार्गदर्शन शिबीरे आयोजीत करुन या योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. आज तागायत ४ हजार प्रकरणांना जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता घेऊन कर्ज मंजुरी साठी बँकांकडे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ६४५ प्रकरणांना बँकांकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी ८७ उद्योगांना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी ३५० उद्योगांना मंजुरी मिळाली आहे. तसेच खादी ग्रामोद्योग अंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी ५७ उद्योगांना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी १५१ उद्योगांना मंजुरी मिळाली आहे. व हे सर्व उद्योग यशस्वीपणे चालू झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्प मंजुरी मध्ये राज्यात धाराशिव प्रथम स्थानी असून शासनाने दिलेल्या उदिष्ट पूर्तीच्या निकट आहे. मार्च अखेर जिल्ह्याचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल असा विश्वास आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.


 
Top