धाराशिव / प्रतिनिधी-

योग्य आर्थिक नियोजन, संस्थेच्या सभासद, खातेदारांना विश्वासपात्र सेवा यामुळेच सहकार क्षेत्रात रूपामाता संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. सभासद, खातेदारांच्या विश्वासामुळे संस्थेच्या शाखांचा विस्तार झाला असल्याचे प्रतिपादन रूपामाता समूहाचे संस्थापक चेअरमन अ‍ॅड.व्यंकटराव गुंड यांनी  केले. 

रूपामाता मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नळदुर्ग येथील शाखेचा दहावा वर्धापनदिन व नूतनीनकरणाचा शुभारंभ शुक्रवारी (दि.17) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगराध्यक्ष नितीन कासार व शहबाज काजी, पत्रकार विलास येडगे, नायब तहसिलदार सचिन मोहिते, सरदारसिंग ठाकुर, दमयंती शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सुभद्राताई मुळे, रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रुपामाता अर्बन-को आँपरेटिव्हचे मुख्य व्यवस्थापक सत्यनारायण बोधले, शाखा व्यवस्थापक गणेश पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना अ‍ॅड.गुंड म्हणाले की, सहकार क्षेत्र अडचणीत आलेले असताना रुपामाता समुहाने जनतेत विश्वास निर्माण केला आहे. एकोणीस वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. अवघ्या 1 लाख 60 हजार रूपयांच्या भाग भांडवलावर सुरू झालेल्या अर्बन व मल्टीस्टेटच्या शाखांचे जाळे वाढले असून धाराशिव जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर एकुण 24 शाखा कार्यरत आहेत. या शाखांमध्ये एकुण आजपर्यत 619 कोटीची व्यवसाय झाला आहे. सर्व शाखांमार्फत मिळून 288 कोटीचे कर्जवाटप केले असून संस्थेमार्फत 42 कोटी रुपयाचे सोनेतारण कर्ज वाटप व 12 कोटीचे मालतारण कर्ज वाटप झाले आहे. संस्थेच्या 24 शाखांमध्ये 147 कर्मचार्‍यांना रोजगार मिळाला असून आणखी दहा शाखा नियोजित आहेत. तर रुपामाता समुहामार्फत दोन गुळ पावडर कारखाने कार्यान्वित आहेत. आणखी एका कारखान्याची रूपामाता समूहात भर पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतात संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल गौरवोदगार व्यक्त केले. कार्यक्रमास नळदुर्ग शहर व परिसरातील मान्यवर, संस्थेचे सभासद, खातेदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top