धाराशिव / प्रतिनिधी-

नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गासाठी शेतजमिनीचे भूसंपादन व रीतसर मावेजा न देता केलेल्या रस्ताकामाचे टाळ-मृदंगाच्या गजरात शेतकर्‍यांनीच प्रतिकात्मक लोकार्पण करुन मावेजा देण्यास टाळाटाळ करणार्‍या जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेती आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची.. अशा जोरदार घोषणा देत आपल्या मागण्याकडे शेतकर्‍यांनी लक्ष वेधून घेतले. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावर शहापूर (ता.तुळजापूर) शिवारातील चंद्रकांत शिंदे यांच्या शेताजवळ गुरुवारी (दि.2) हा प्रतिकात्मक लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रतिकात्मक लोकार्पण सोहळ्यासाठी अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते, परंतु एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नाही.

 मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संयुक्त भूसंपादन मोजणी व फेरसंयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे शेतकर्‍यांच्या मालकी हक्काचे बाधित क्षेत्र तात्काळ संपादित करुन मावेजा देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार्‍या भूसंपादन अधिकारी राजकुमार माने यांची खातेनिहाय चौकशी करुन तत्काळ बदली करावी व इतर प्रमुख मागण्यांसह मालकी हक्काच्या जमिनी वारंवार बेकायदेशीरपणे मोजून त्या रस्त्याच्या कामासाठी बळकावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून वेळोवेळी केला जात असल्याचा शेतकर्‍यांचा आक्षेप आहे. याकरिता शेतकर्‍यानी वारंवार निवेदने देऊन, उपोषण आंदोलन करुन देखील जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निकालाला देखील अधिकार्‍यांनी कोलदांडा घालून मनमानी चालविल्याच्या निषेधार्थ गुरुवारी हे प्रतिकात्मक लोकार्पण करुन अनोखे आंदोलन केले.

 यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर म्हणाले की, शेतकर्‍यांना जाणूनबुजून त्रास देऊन त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून जमिनी बळकावून रस्त्याचे काम केले असून उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचाही अवमान करत शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे संयुक्त मोजणी होऊन पाच महिने झाले. त्याचप्रमाणे संपादन करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे यापुढे दर महिन्याच्या एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालया समोर कोणत्याही प्रकारचे निवेदन न देता उपोषण करून न्याय मागणी करणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

 शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व धाराशिवचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, तहसीलदार हे जाणीवपूर्वक शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगून शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळू नये यासाठी सर्व अधिकारी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना बाधित शेतकरी माजी सैनिक चंद्रकांत सोपान शिंदे यांनी अधिकार्‍यांच्या मनमानीचा निषेध केला.

 यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व्यंकट पाटील, प्रशांत शिवगुंडे, बाळासाहेब लोंढे पाटील, दिलीप पाटील, पंडित पाटील, पंडित निकम, लक्ष्मण निकम, खंडू हलकंबे, काशिनाथ काळे, सुभाष पाटील, रहमान शेख, प्रताप ठाकूर, बालाजी ठाकूर, दयानंद लोहार, तोलू पाटील, बंडू मोरे, आबा मोरे, तुकाराम सुरवसे, नरसिंग निकम, टिकंबरे, कांबळे, जवळगे यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


 
Top