धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव जिल्ह्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने धमक्या देवून व चाकूचा धाक दाखवून सतत लैंगिक अत्याचार केला. यामध्ये पिडीत मुलगी गरोदर राहून तीने नवजात बालकाला जन्म दिला. या प्रकरणी कळंब येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 28 मार्च रोजी आरोपीला 10 वर्षाची सक्तमजुरी व 20 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणाची विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी दिलेली माहिती अशी की, एका विटभट्टीवरील ट्रॅक्टर चालक सागर अशोक लोहार (रा. ढोकी ता. धाराशिव) एका अल्पवयीन मुलीचे आई-वडील मजुरीसाठी शेतात गेल्यानंतर तीच्यावर चाकूचा धाक दाखवून सतत लैंगिक अत्याचार करायचा. यामध्ये ती पिडीत मुलगी तीन महिन्याची गरोदर राहिली. या प्रकरणी पिडीतेने 14 डिसेंबर 2017 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी करून तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी धाराशिव येथील अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगताप यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले. विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून सचिन सुर्यवंशी यांनी काम पाहीले. सदर प्रकरण निकालासाठी प्रलंबित असताना कळंब येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन झाल्याने कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश किरण बागे-पाटील यांच्या न्यायालयात वर्ग झाले. सदर प्रकरणात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता आशिष कुलकर्णी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून एस. एस. आदमाने यांनी काम पाहिले.

पिडीतेला आरोपीकडून झालेल्या नवजात बालकाचे, पिडीता व आरोपीचे यांचे डीएनए नमुन्याच्या अहवालानुसार सदर नवजात बालकाचे जनुकीय माता ही पिडीता असून जनुकीय पिता आरोपी असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी व डीएनए अभिप्राय देणारे रासायनिक विश्लेषक यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सदर प्रकरणात आलेला ठोस पुरावा व पिडीतेचा वैद्यकीय अहवाल व डीएनए अहवाल ग्राह्य धरून कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश किरण बागे-पाटील यांनी आरोपीस दोषी धरून 10 वर्षाची शिक्षा व 20 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे कळंब येथे 5 मार्च 2023 रोजी नव्याने स्थापन झालेल्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने तात्काळ प्रकरण हातावर घेवून निकाल दिला आहे.


 
Top