तुळजापुर / प्रतिनिधी-

 सार्वजनिक ग्रंथालयाचा प्रसार, प्रचार व संवर्धन याकरिता गेली पन्नास वर्ष काम करणारे राज्यशासन मान्यताप्राप्त ग्रंथमित्र व ग सूर्यवंशी यांना अनुसया सार्वजनिक वाचनालय वझुर परभणी यांच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी सूर्यभान पवार यांच्या नावे सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उदय  भोसले ,महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य प्राचार्य बाबुराव सोळुंके, सातारा येथील व्याख्याते व प्राचार्य यशवंत पाळणे, माजी आमदार गंगाधर पटणे या मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

  सत्काराला उत्तर देताना ग्रंथ मित्र सूर्यवंशी म्हणाले की, यापूर्वी मिळालेल्या पाच पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार मराठवाडा स्वातंत्र्य सेनानी सूर्यभान पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिळत असल्याने तो आपला कौटुंबिक सत्कार आहे असे आपण मानतो व याचा नम्रपणे स्वीकार करतो असे मत व्यक्त केले. यावेळी आयोजक प्रा.डॉ.रामेश्वर पवार, अभिषेक मोरे, हर्षवर्धन सूर्यवंशी ,संपदा सूर्यवंशी, पवार कुटुंबीय यांच्यासह सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल व कर्मचारी ग्रामस्थ  उपस्थित होते.


 
Top