तेरच्या उत्तरेस तेरणा नदीच्या काठावर संत गोरोबा काकांच्या समाधी परिसरात अंतराल विरहीत आणि मंडपाने युक्तः विटांनी बांधलेल्या कालेश्वर मंदिराचे शिखर द्रविडी पध्दतीचे आहे. या मंदिरासमोरील मंडप उत्तर मध्ययुगातील आहे. त्याच्या कमानी मुस्लीम शैलीच्या आहेत. गर्भगृहावरील शिखराचा भाग आणि अंतर्भागातील कार्बोलिंग मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. मंदिराचे छत चौरस, निमुळते! होत जाणारे आहे. त्यावर चौरस तलविन्यासाची स्तुपिका आहे. स्तुपिकेवरील शंक्वाकृती भाग आधुनिक काळात बसविण्यात आलेला आहे. उत्तरेश्वर मंदिराप्रमाणेच या मंदिराच्या शिखरावरही शालशिखरे आणि कुटशिखरे यांनी युक्त (अधिक विकसित) असलेले मजले (तल) आहेत. त्याचप्रमाणे शिखराच्या तळावर मकर प्रयोजने आहेत. मंडपाच्या भिंतीच्या बांधणीत अनेक वीरगळांचा वापर केला आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग असले तरी गणेश पट्टीवर गरूडाची प्रतिमा आहे. या मंदिराचा काळ आणि शैली उत्तरेश्वर मंदिराशी मिळतेजुळते असल्यामुळे कालेकर मंदिर नवव्या शतकातील असावे, असे मत आहे.

 
Top