नळदुर्ग / प्रतिनिधी-

 स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी यांनी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला.

         माजी नगरसेवक विनायक अहंकारी हे गेल्या बारा वर्षांपासुन राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करीत आहेत. याहीवर्षी दि.२३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन विनायक अहंकारी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावर्षी विनायक अहंकारी यांनी स्वच्छता विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा साडी, चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर पुरुष कर्मचाऱ्यांचा टॉवेल टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. यावेळी नगरपालिकेच्या वतीने सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

        नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगरसेवक संजय बताले, नितीन कासार, शहेबाज काझी, कमलाकर चव्हाण, पत्रकार विलास येडगे, न.प.चे कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, नवल जाधव, श्रमिक मोरे आदीजन उपस्थित होते.

        प्रारंभी राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संजय बताले, कमलाकर चव्हाण, शहेबाज काझी यांनी मार्गदर्शन करतांना विनायक अहंकारी यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक अहंकारी यांनी केले तर आभार स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख यांनी मानले. या कार्यक्रमास न.प.चे सर्व कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. 


 
Top