धाराशिव / प्रतिनिधी-

महावितरणअंतर्गत डिजिटल मीटर रिडींगचे काम प्रामाणिकपणे करत असतानाही दोन वर्षापासून काम न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या महिला बचत गट सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार (दि.28) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. बचत गटांमार्फत रीतसर पत्रव्यवहार करुनही काम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. नियोजित महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्ष सौ.मनीषा शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बचत गटाच्या महिलांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

 धाराशिव तालुक्यातील कै.गयाबाई महिला बचत गट(येवती), शहाजमानी महिला बचतगट (शिराढोण,ता.कळंब) या बचत गटांमार्फत 2010 पासून डिजिटल मीटर रिडींग आणि वीजबिल वाटपाचे केले जात आहे. 2020 सालापासून या बचत गटांना कोणतेही काम न मिळाल्याने महिला सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मीडिर रिडींगचे काम मिळावे याकरिता अर्ज केल्यानंतर कळंब येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे काम देणेबाबत शिफारसही केलेली आहे. तसेच यापूर्वी केलेल्या कामाच्या आधारे महावितरणच्या उपकारी कार्यकारी अभियंता (तेर), कळंब येथील कॉम्प्युटर व डाटा पर्चिंग फर्म यांनी शिफारसपत्रही दिलेले असून या गटावर आजपर्यंत कोणताही अपहार अथवा कोणत्याही प्रकारच्या तक्रार  नाही. त्यामुळे मीटर रिडींगचे काम पूर्ववत देण्यात यावे या मागणीासाठी महिलांनी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.

 या आंदोलनात नियोजित महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्ष सौ.मनीषा शिवाजी पाटील, शहाजमानी महिला बचतगटाच्या अध्यक्ष मालिका पठाण,  कै.गयाबाई महिला बचतगटाच्या अंजना बालाजी हुबाले, नौशीन पठाण, अरशिया शेख तसेच तनिष्का महिला बचत गट, गरुडझेप स्वयंसेवी संस्था व इतर गटाच्या सदस्यांनी सहभाग घेतला आहे.


 
Top