धाराशिव /प्रतिनिधी

 महाराष्ट्रातील कष्टकरी वडार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हिंदकेसरी पै.मारुती माने वडार आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शविली आहे. लातूर येथे झालेल्या वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात श्री.फडणवीस यांनी दिलेल्या शब्दानुसार औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेमुळे समाजाचे मागासलेपण दूर होणार असल्याने वडार बांधवांमधून उपमुख्यमंत्री फडणवीस, आ.अभिमन्यू पवार यांचे वडार समाजबांधवांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

 महाराष्ट्रातील कष्टकरी वडार समाज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशातील इतर राज्याप्रमाणे संवैधानिक सवलतीपासून वंचित आहे. त्यामुळे शाहू, फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही वडाराचा समाज शैक्षणिक आर्थिक व पर्यायाने सामाजिक विकास झालेला नाही. त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करुन त्यास हिंदकेसरी पै.मारुती माने वडार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. लातूर येथे दि. 03/06/2018 रोजी झालेल्या वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून तमाम कष्टकरी, गरीब वडार समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर आ.अभिमन्यू पवार आणि राज्याचे मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत या मागणीवर शिक्कामोर्तब झाले होते. लवकरच महामंडळाची स्थापना होऊन समाजाला न्याय मिळेल अशी भावना वडार बांधवांमधून व्यक्त होत आहे.


 
Top