उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने जिल्हयात "जागरुक पालक, सुदृढ बालक" अभियानाअंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील 3 लाख 69 हजार  बालकांची आरोग्य तपासणी  करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान आजारी आढळुन आलेल्या बालकांना विशेषज्ञांकडे संदर्भीत करण्यात येऊन पुढील तपासण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. तरी सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी  या आरोग्य मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  महाराष्ट्र राज्य. डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांच्या सुचनेनुसार राज्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वागीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, अदिवासी विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने "जागरुक पालक तर सुदृढ बालक" हे अभियान राज्यभर दिनांक  9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून कालबध्द पध्दतीने आठ आठवडयात पूर्ण होणार आहे.

 या अभियानात ० ते 18 वर्षापर्यंतच्या जिल्हयातील एकुण चार लक्ष वीस हजार सर्व बालकांची /किशोरवयीन मुला-मुलींची शाळा, महाविद्यालये, अंगणवाडया, आश्रम शाळा ई. ठिकाणी शालेय आरोग्य तपासणी पथक, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकिय अधिकारी त्यांच्या आरोग्य पथकामार्फत प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. व त्यामध्ये आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरीत उपचार केले जाणार आहेत. यामध्ये गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे ( उदा. औषधोपचार, शस्त्रक्रीया ई), तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येईल. या अभियानांतर्गत जिल्हयातील सर्व शाळा, बालगृहे, बालसुधार गृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांसह विटभट्टी कामगारांच्या शाळाबाहय बालकांची तपासणी करण्यात येणार आहे.

 यासाठी विविध स्तरावर पथके आणि बाल आरोग्य तपासणी पथके स्थापन करण्यात आले असून कार्यक्षेत्रानूसार तपासणी आणि कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. संदर्भ सेवेसाठी प्रथमस्तर तपासणी व उपचार जिल्हयातील सर्व प्रा.आ.केंद्रस्तरावरुन होईल, व्दितीयस्तर तपासणी व उपचार हे जिल्हयातील सर्व ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय स्तरावरुन होईल तर तृतीयस्तर तपासणी व उपचार हे जिल्हा रुग्णालय, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि महात्मा फूले जन आरोग्य योजने अंतर्गत मान्यताप्राप्त दवाखान्यातुन होईल.

 या अभियानाचे सनियंत्रण व पर्यवेक्षण हे प्राथमिक आरोग्य. केंद्र स्तरापासून राज्यस्तरापर्यंत विविध टप्प्यात होईल. यात जिल्हास्तरीय सनियंत्रण व पर्यवेक्षण हे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी आणि निवासी वैद्यकिय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

 या अभियानांतर्गत नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळयांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सीसह अन्य आजारांची तपासणी आणि औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत.

 " जागरुक पालक तर सुदृढ बालक" या अभियानाची जिल्हा समन्वय समितीची बैठक आज मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकूमार हालकुडे, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं.) डॉ . इस्माईल मुल्ला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर, शिक्षणधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण बळीराम निपाणीकर, डॉ.सुशिल चव्हाण यांचेसह सर्व जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री. गुप्ता यांनी अभियानाच्या पूर्वतयारी आणि कृति नियोजनाचा आढावा घेवून अभियाना बाबत मार्गदर्शन करुन "जागरुक पालक तर सुदृढ बालक" अभियान यशस्वी करावे अशा सुचना सर्व संबंधितांना निर्गमित केल्या.आजपासून सुरु होणाऱ्या "जागरुक पालक तर सुदृढ बालक" या अभियानाचा जिल्ह्यातील सर्व पात्र आणि गरजुंनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहूल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे.


 
Top