उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकर्‍यांना उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मावेजा न देता आणि न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली असताना 30 किमी काम पूर्ण झाल्याचे लेखी पत्र दिले आहे. रीतसर मावेजा न देता उलट शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करुन दमदाटी केली जात असल्याच्या निषेधार्थ महामार्गावरील शहापूर शिवारात (ता.तुळजापूर) येथील बाधित शेतकरी चंद्रकांत सोपान शिंदे यांच्या शेतातून तयार केलेल्या रस्ताकामाचे प्रतिकात्मक लोकार्पण 2 मार्च रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी पद्धतीने करण्यात येणार्‍या या प्रतिकात्मक लोकार्पणासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्यासह महसूल, महामार्ग व भूमी अभिलेखच्या अधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती समितीचे समन्वक दिलीप जोशी यांनी दिली.

 शेतकरी संघर्ष समितीच्या अनोख्या गांधीगिरी लोकार्पणाला जिल्हाधिकार्‍यांसह उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) योगेश खरमाटे, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी राजकुमार माने, जिल्हा भूसंपादन अधिकारी श्री.शेळके, राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूरचे कार्यकारी अभियंता श्रीकांत गायकवाड, तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे श्री.राजगुरू, विवेक मोटगी, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि सिद्धेश्वर गोरे, जळकोट व इटकळचे मंडळ अधिकारी तसेच बाधित क्षेत्रातील तलाठ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या प्रतिकात्मक लोकार्पण सोहळ्याला नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावरील बाधित शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही शेतकरी संघर्ष समितीने केले आहे.

 सोलापूर जिल्ह्यातील चुंगी येथेही होणार आंदोलन

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील चुंगी शिवारातही शेतकर्‍यांना मावेजा न देताच महामार्गाचे काम करण्यात आलेले आहे. या रस्ताकामाच्या प्रतिकात्मक लोकार्पणाला सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व संबंधित अधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आलेले असल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी दिली.

 
Top