उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयावरून कारचा पाठलाग सुरू केल्यानंतर ती कार ट्रॅक्टरच्या ट्रेलरला धडकली. पथकाने कारची पाहणी केली असता त्यामध्ये 130.5 किलो गांजा मिळून आला. 

या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात 16 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद स्थानिक.गुन्हे.शाखेचे पथक अवैध धंद्यावर आळा घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत होते. गस्ती दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास एका विना नोंदणी क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या कारचा पोलीसांनी संशयावरुन पाठलाग सुरु केला. ती कार पोलीसांना टाळून अतीवेगात बीडच्या दिशेने जावू लागली.  शिंगोली विश्राम गृहासमोरील राष्ट्रीय महामार्गावर कार चालकाच्या चुकीने ती कार अनियंत्रीत होवून ट्रॅक्टर-दुहेरी ट्रेलरला धडकली. या अपघातस्थळी पथकाने व आनंदनगर पोलीसांच्या सपोनि-गोरक्ष खरड यांच्या पथकाने भेट दिली होती. यावेळी त्याकारच्या डिकीमध्ये व मागील आसनावर  ठेवलेल्या 65 पुड्यांतुन 130.5 कि.ग्रॅ. वजनाच्या गांजा आढळून आला. या अंमली वनस्पतीची अवैध वाहतूक कारचालक दिनेश भवरलाल जाट (वय 21) वर्षे व त्याचा सहकारी शाहरुख जाकीर पठाण, दोघे रा. राजस्थान राज्य हे आंध्रप्रदेशातुन राजस्थानकडे करत असल्याचे आढळले.

 या प्रकरणी पोलीसांनी नमुद गांजासह कार, 2 स्मार्टफोन जप्त करुन दोन्ही आरोपींना अटक केली. पोउपनि-चंद्रशेखर पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम 8, 20 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शाचे पोनि- जाधव, आनंदनगर पोलीस ठाण्याचे  पारेकर, सपोनि- पवार, खरड पोउपनि- संदिप ओव्हळ तसेच आनंदनगर व स्थागुशा पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.


 
Top