उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रजासत्ताक दिनाचा 73 वर्धापन दिन दि.26 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्याच्या अनुषंगाने पुर्वतयारी बैठक आज जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

  प्रजासत्ताक दिन पुर्व तयारी आढावा बैठकीच्या वेळी डॉ.सचिन ओम्बासे बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी तसेच इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी सर्व विभाग प्रमुखांना प्रजासत्ताक दिनी करावयाच्या कामाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्यामध्ये दि.26 जानेवारी रोजी दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे की वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध आणि कविता स्पर्धांचे आयोजन करावे. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावेत, एनएसएस व एखाद्या विषयाचा वेबीनार आयोजित करावा. एनएसएस आणि एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी. तसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा तसेच संदेश देण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी डा.ओम्बासे यांनी यावेळी दिल्या.

 ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ हा श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदान येथे दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 09.15 वा. पालकमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याने ध्वजारोहणाची संपूर्ण तयारी करणे. पालकमंत्री यांच्यासाठी पायलट गाडीची व्यवस्था करणे. निमंत्रितांना बसण्यासाठी प्रतीवर्षी प्रमाणे आसन व्यवस्था, खुर्च्यावर राजशिष्टाचार शासन निर्णयानुसार आसने राखीव ठेवणे व आसनावर नावाच्या चिठ्ठ्या लावण्याकरिता तहसीलदार यांच्या समन्वयाने पूर्ण करावे. ध्वजस्तंभाच्या दोन्ही बाजूस शामियांना टाकणे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, न.प.मुख्याधिकारी, तहसीलदार यांच्या मदतीने पूर्ण करून घ्यावे. माईक, बॅण्ड ची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयाने करून घ्यावी.

 जिल्हाधिकारी कार्यालयाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 08.15 वा. आणि मध्यवर्ती प्रशासकयी इमारतीच्या प्रांगणातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8.25 वा. अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असल्याने या दोन्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने, ध्वजाची व दोरीची तपासणी करणे तसेच ध्वजारोहणाचे वेळी जबाबदार प्रतिनिधीची नेमणूक करावी. ध्वजस्तंभ ओटा, ध्वजाची दोरी आदी तपासणी करणे तसेच ध्वजारोहणाचे दिवशी ध्वजारोहणाचे वेळी जबाबदार प्रतिनिधी हजर ठेवणे. तसेच ध्वजारोहणाचे दिवशी ध्वजारोहण झाल्यापासून ध्वज उतरविणे पर्यत ध्वजाचे संरक्षण करण्यासाठी पोलिस  कर्मचारी यांची नियुक्ती करावी.

 उपविभागीय अधिकारी यांनी ध्वजारोहन कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रिडा संकुल येथील मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून आपण कामकाज पहावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. निमंत्रण पत्रिका सर्व संबंधितास वेळेवर तहसीलदार यांचे मार्फत वेळेत पोहचतील यांची नोंद घेणे. मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील ध्वजारोणाचे मिनिट टु मिनिट नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस विभाग यांच्याशी संपर्क साधून उचित कार्यवाही करावी.

 निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य शासकीय कार्यक्रमा करिता एक संपर्क अधिकारी यांचे नियुक्ती आदेश आणि पालकमंत्री यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे. पालकमंत्री यांच्या करिता निवासाची आणि इतर अनुषंगीक व्यवस्था करणे. प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिना करिता राजशिष्टाचार अधिकारी या नात्याने मुख्य शासकीय ध्वजारोणाचा आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पहाणे.

 कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदान आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातील ध्वज ओट्याची आणि स्मृतीस्तंभाची तपासणी करुन उचित कार्यवाही करणे. श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदान आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाच्या वेळी शामीयाना टाकणे, अतिथींना बसण्यासाठी सोफासेट, खुर्च्याची व्यवस्था करणे. तसेच दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करणे.

  नगर परिषद मुख्याधिकारी यांनी श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदान, जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारत प्रांगण साफसफाई तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण (Sanitization) करणे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृतीस्तंभ दि. 25 जानेवारी 2023 रोजी स्वच्छ करून घेणे. शहराच्या प्रमुख ठिकाणी असलेले ढिगारे, खड्डे आदी साफ करून घेणे. श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदान आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण येथील कार्यक्रमाच्यावेळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.

 उस्मानाबाद तहसीलदार यांनी श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदान आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील आसन व्यवस्था राजशिष्टाचार प्रमाणे करणे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शामियाणा टाकण्याची, खुर्च्यांची आणि ध्वनीक्षेपकांची व्यवस्था करणे. जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळी पताका इत्यादीची व्यवस्था करणे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दि.26 जानेवारी रोजी सकाळी 08.15 वा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याने त्याअनुषंगाने कामकाज करणे. या दिवशी कार्यक्रमाच्यावेळी कार्यक्रमस्थळांच्या ठिकाणी कोणताही अनुसुचित प्रकार घडणार नाही तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जाईल यांची नोद घ्यावी.

 उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी यांनी कार्यक्रमाची प्रसिध्दी देणे आणि पालकमंत्री यांचे भाषण तयार करणे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्यावेळी फोटो काढणे, चित्रफित आदी व्यवस्था करणे तसेच कार्यक्रमाचे फोटो पालकमंत्री यांना पोहोच करणे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम अधिकाधिक नागरिकांना घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करावे.

 अधिक्षक अभियंता महावितरण, कार्यकारी अभियंता यांनी मुख्य कार्यक्रमाच्या वेळी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोणाचे वेळी विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता घेणे. लोड शेंडीग बाबत उचित कार्यवाही करणे.

 राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातील ध्वजारोहण हे अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सकाळी 08.25 वा. होणार असल्याने ध्वजारोहणाची संपूर्ण तयारी करणे आणि होत असलेल्या कार्यवाही बाबत अपर जिल्हाधिकारी यांना अवगत करणे.

 जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदान येथे प्राथमिक उपचारासाठी वाहनासह एक डॉक्टरांचे पथक वाहनासह हजर ठेवणे. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

 उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणाऱ्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभा रोजी वाहतूक व्यवस्था पाहणे.

 जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ हा श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रिडा संकुल येथील मैदान येथे होणार असल्याने मैदान सुस्थीतीत ठेवणे. तसेच ध्वजस्तंभ ओटा सुस्थितीत ठेवण्याच्या अनुषंगाने कामकाज पाहणे, मैदानावरील साफसफाई करणे.

 या प्रमाणे दिलेल्या सूचना सर्व साधारण असून, सर्व खातेप्रमुखांनी आणि अधिकारी यांनी समन्वयाने कामे पूर्ण करुन घेवून पूर्ततेचा अहवाल दि. 24 रोजी उपविभागीय अधिकारी यांना सादर प्रत या कार्यालयास सादर करावी.


 
Top