परंडा / प्रतिनिधी - 

चारित्र्यसंपन्न बुद्धी संपन्न आणि लोकसेवेसाठी सर्वस्व समर्पण करणारे युवक आज हवे आहेत असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी येथील कल्याण सागर माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

कल्याण सागर माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन केले होते ते प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आजची शिक्षण पद्धती दशा व दिशा या विषयावर त्यांनी आपले व्याख्यान दिले .यावेळी विचार पिठावर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड, रा गे शिंदे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख उपस्थित होते.

यावेळी उत्कर्ष गजानन कोठावळे कल्याण सागर माध्यमिक विद्यालय परांडा या विद्यार्थ्याने खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला. युवा स्पंदन सामाजिक संस्था आणि मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापूर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन केले होते .

      पुढे बोलताना डॉ शहाजी चंदनशिवे म्हणाले की या कल्याण सागर समूहामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राविण्य निर्माण केले आहे. या शाळेची परंपरा आहे. तेव्हा वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सर्व विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाव्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. परिस्थिती आणि अभ्यास याचा काहीही संबंध नसताना काही विद्यार्थी परिस्थितीवर अवलंबून राहतात तर त्यांनी केवळ प्रामाणिकपणे अभ्यास करून स्वतःचे आणि आपल्या आई वडिलांचे नाव समाजामध्ये करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की आजच्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या नउ उपक्रमशील व सर्जनशील मनाला खाद्य व आव्हान पुरवणारे शिक्षण पद्धती हवे आहे. हे उद्याचे निर्माते आहेत. त्यांना त्याविषयी आज चिंतन करायचे आहे  . आज आपण ज्या विज्ञान क्षेत्रात कार्य करत आहोत त्यामध्ये नव उपक्रमशीलता व दूरदृष्टी असली पाहिजे आणि भविष्यात स्पर्धात्मक जगात आपण तंत्रज्ञान केंद्र बनण्याचे भव्य स्वप्न पाहिले पाहिजे . विद्यार्थ्याचे कौतुक करत प्राध्यापक डॉ राहुल देशमुख, सुरेश जाधव, अमोल कोकाटे, संतोष माळी यांनी प्रत्येकी 500 रुपये त्याला स्पर्धा परीक्षेसाठी भेट म्हणून दिले. तर डॉ शहाजी चंदनशिवे यांनी त्याच्यासाठी दहावी मध्ये लागणारे सर्व पुस्तके वह्या आणि परीक्षा फीस व प्रवेश फीस दिली जाईल असे आव्हान त्यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करू नये पुस्तके वाचून आपले ज्ञान अमर्यादित करावे. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top