परंडा प्रतिनिधी -

 परंडा तालुक्यातील खासापुरी नंबर दोन येथील स्थानांतरित झालेल्या गावकऱ्यांची झालेली  अवस्था पाहता वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने खासापुरी गावात भेट घेतली व तेथील गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या यावेळी फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे, परंडा शहराध्यक्ष किरण दादा बनसोडे, फुले आंबेडकर विद्वत्त सभेच जिल्हा समन्वयक डॉ आनंद देडगे यांची उपस्थिती होती. यावेळी संपूर्ण गाव अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्यानंतर तेथील लोकांशी संवाद साधला. प्रशासनाने काय भूमिका घेतली आहे, तेथील राहणाऱ्या लोकांची व्यवस्था काय केली आहे, आरोग्य सेवा, स्वच्छता सेवा, लाईट सेवा, पाणीपुरवठा सेवा अशा विविध विषयावरती चर्चा करण्यात आल्यानंतर त्याच गावातील सद्दाम बशीर शेख यांनी या संपूर्ण स्थानांतरित गावकऱ्यांसाठी चार एकर जमीन देऊन  सामाजिक भूमिका व जबाबदारी पार पाडत एकात्मतेचे दर्शन त्यांनी घडविले आहे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी खासापुरी गावातील मच्छिंद्र तात्या देशमुख हे नेतृत्व करत असताना त्यांच्याकडून गावकऱ्यांची चांगल्या प्रकारे सोय होत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामसेवक उल्हास देवकते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या गावातील लोकांसाठी प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. लवकरच आरोग्य सेवा, स्वच्छता सेवा, लाईट सेवा, सोलर सेवा ,पाणीपुरवठा अशा वेगवेगळ्या सुविधा    प्रशासनाकडून  करण्यात आल्या आहेत .यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आम्हास सर्वप्रथम दर्जेदार पक्का रस्ता आणि त्याबरोबरच राहण्यासाठी पक्की घरे व पाण्याची व्यवस्था आणि सरकारी शाळा या ठिकाणी आवश्यक आहे. गेल्या एक महिन्यापासून या गावातील विद्यार्थी शाळेमध्येच गेले नसल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे. गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले आंदोरा हे गाव दूर असल्याने विद्यार्थ्यांना चालत जाणे किंवा सायकलवर जाणे अवघड आहे. कारण रस्ता नाही त्यातच आजूबाजूला विविध शेतामध्ये पीक आल्याने भीती वाटत असल्याचे सांगत त्यांनी घरीच बसून अभ्यास करत आहोत असे सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल हे लवकरच या गावास भेट देऊन प्रशासनाची काय भूमिका असणार याची माहिती घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी कार्यकर्त्याकडून देण्यात आले. यावेळी संपूर्ण  गाव एकत्र येऊन त्यांच्याशी विविध विषयावरती चर्चा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी असल्याचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी सर्व गावकऱ्यांशी सांगितले. फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक डॉ आनंद देडगे यांनीही सांगितले की मी हे गाव आरोग्यसेवेसाठी दत्तक घेत आहे.जोपर्यंत या गावांमध्ये आरोग्य सेवा मिळत नाही तोपर्यंत मी या गावाची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गावातील आरोग्य सेवेचा तातपुरता तरी प्रश्न मिटला आहे.

 
Top