उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मागील 15 वर्षांपासून सुरू असलेल्या महत्वपूर्ण अशा मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सौभाग्यवती शांताबाई लिंबराज काकडे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार समाधान शिकेतोड, कुस्तीपटू पौर्णिमा खरमाटे हिला क्रीडाभूषण तर छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार अणदूर येथील हॅलो मेडिकल फौंडेशनला जाहीर करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने समाजातील विविध घटकांत अतुलनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख, कार्याध्यक्ष सौरभ देशमुख, सचिव महेश उंबरे यांच्या उपस्थितीत समिती पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी समितीच्यावतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. नवी मुंबई येथील पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांच्या मातोश्रींना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर कुस्तीमध्ये मोठ्या संघर्षाने स्वतःचा नावलौकिक सिध्द करणार्‍या पौर्णिमा खरमाटे हिचाही सन्मान केला जाणार आहे. विविध शैक्षणिक प्रयोगातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढविण्यासाठी कार्यरत असलेले समाधान शिकेतोड यांना कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न तर मागील तीन दशकांपासून आरोग्य, शिक्षण, लिंग समभाव, अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या अणदूर येथील हॅलो मेडिकल फौंडेशनला छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने गुरूवार, 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीदिनी गौरविण्यात येणार आहे.


 
Top