उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 समाजातील भल्या बुर्‍या बाबींवर परखड भाष्य करुन त्याच्या नायनाटासाठी पाठपुरावा करणारी आजची पत्रकारिता म्हणजे कम्युनिटी पोलिसींगच आहे. सुरक्षिततेची भावना जनतेत रुजण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण आहे, अशा शब्दांत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कौतुक केले.

उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकारांच्या गौरवसोहळ्यात ते बोलत होते. दर्पणदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 6) शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते.

अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, की समाजात शांतता टिकून राहावी यासाठी उस्मानाबाद पत्रकार संघाकडून राबविलेले गेलेले उपक्रम म्हणजे कम्युनिटी पोलिसींग आहे. जनता व पोलिस यांच्यातील संवाद साधणारा, या दोन्ही घटकांना एकत्र आणणारा दुवा म्हणजे पत्रकार आहेत. उस्मानाबादेत पत्रकारितेचे सकारात्मक दर्शन घडते. पोलिसांनीही आता सायबर क्राईम रोखण्याच्या दृष्टीने जनजागृती केली आहे. सुरक्षित समाजासाठी पत्रकार व पोलिसांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

ज्येष्ठ पत्रकार कमलाकर कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सचिव भीमाशंकर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर, माजी अध्यक्ष महेश पोतदार, उपाध्यक्ष बालाजी निरफळ, कोषाध्यक्ष जी. बी. राजपुत, सयाजी शेळके, राकेश कुलकर्णी,  चेतन धनुरे, विकास सुर्डी, बाबुराव चव्हाण, तानाजी जाधवर, बाळासाहेब माने, ओंकार कुलकर्णी, कळंब पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, शितलकुमार धोंगडे, आकाश नरोटे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, तालुका सचिव राजेंद्रकुमार जाधव, सुधीर पवार आदी उपस्थित होते. रवींद्र केसकर यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी शहरातील सर्वच वृत्तपत्र विक्रेत्यांचा, आपापल्या क्षेत्रात उल्‍लेखनीय काम केलेल्यांचा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

--------

पत्रकारांना विम्याचा लाभ

अध्यक्ष देशमुख म्हणाले, की पत्रकार तसेच त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्य विमा उतरविण्यात येणार आहे. यासोबतच वृत्तपत्र विक्रेत्यांनाही हा लाभ दिला जाणार आहे.


 
Top