नळदुर्ग/प्रतिनिधी  

 येथील खंडोबा यात्रेत दि.७ जानेवारी रोजी पार पडलेल्या चित्तथरारक व डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्ती स्पर्धेने खंडोबा यात्रेची सांगता झाली. या कुस्ती स्पर्धेत क्रमांक एकची मानाची कुस्ती विद्यमान महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांने जिंकली असुन त्यांने सेनादलाचा पैलवान उत्तरप्रदेश केसरी मोहीत कुमार याचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य व दृष्टी उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली श्री खंडोबा यात्रा कुस्ती समिती व नगरपालिकेने आयोजित केलेली ही भव्य कुस्तीस्पर्धा अतीशय चांगल्याप्रकारे पार पडली. या स्पर्ध्येत १०० च्या वर कुस्त्या पार पडल्या. कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.

       दि.७ जानेवारी २०२३ रोजी नळदुर्ग (मैलारपुर) येथील श्री खंडोबा यात्रेत लाखो रुपयांच्या बक्षिसांची कुस्ती स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेला राज्यातील नामवंत पैलवानांनी हजेरी लाऊन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतीसाद दिला. या स्पर्धेत १०० पेक्षा जास्त कुस्त्या झाल्या. या कुस्ती स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली श्री खंडोबा यात्रा कुस्ती समितीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकुर, उपाध्यक्ष अनिल पुदाले,कोषाध्यक्ष संजय मोरे, कुस्ती स्पर्धा संकल्पनेचे प्रमुख विनायक (बंडू) पुदाले यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतीशय सुंदर व चांगल्याप्रकारे केले होते.

      या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची कुस्ती विद्यमान महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील व सेनादलाचा उत्तर प्रदेश केसरी पै. मोहीत कुमार यांच्यात झाली ही कुस्ती अतीशय चित्तथरारक, लक्षवेधी व कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. या कुस्तीमध्ये पै. पृथ्वीराज पाटील यांने अवघ्या चार मिनिटात पै. मोहीत कुमार याला चितपट करीत अस्मान दाखविले. मजबुत शरीरयष्टी असलेल्या मोहीत कुमारला पृथ्वीराज पाटील याने अक्षरशा खांद्यावर घेऊन अस्मान दाखविले. या कुस्तीने कुस्ती पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यामध्ये विजयी ठरलेल्या पै. पृथ्वीराज पाटील याला दृष्टी उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांच्याकडून रोख १ लाख ५१ हजार रुपये व कै. नरहरी बापुराव पुदाले यांच्या स्मरणार्थ पुदाले परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलेला दोन किलो वजनाचा मानाचा चांदीचा गदा अशोक जगदाळे व कुस्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.

     या स्पर्ध्येत अनेक नामवंत पैलवानांच्या कुस्त्या पार पडल्या. नळदुर्गचा छोटा पैलवान व सध्या अनेक कुत्यांचे आखाडे गाजविणारा पै. समर्थ घोडके याने दोन कुत्यांमध्ये विजयी होऊन पुन्हा एकदा ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे नाव कुस्ती स्पर्धेत उज्वल केले आहे.त्याचबरोबर स्पर्धेतील नंबर दोनची ४१ हजार रुपयांची कुस्ती पै. रामलिंग नारंगवाडे व पै. सुरज हालगुडे यांच्यात झाली मात्र ती बरोबरीत सुटली. त्याचबरोबर पै. राहुल मुळे विरुद्ध पै. प्रेम पाटील, पै. जीवन भुजबळ विरुद्ध पै. प्रशांत कवडे, पै. रितेश भोसले विरुद्ध पै. धनु गाडे,सतीश बसरगे विरुद्ध पै. राघवेंद्र बर्वे, पै. महादेव घोडके विरुद्ध पै. आकाश भोसले, पै. सत्यप्रकाश नरोटे विरुद्ध पै. पवन भुजबळ यासह अनेक कुस्त्या अतीशय रंगतदार झाल्या. लहान मुलांच्या कुस्त्याही अतीशय चांगल्या झाल्या. या स्पर्धेसाठी नळदुर्ग शहरांतील अनेकांचे योगदान लाभले. अनेकांनी रोख रकमेच्या कुस्त्या लावल्या होत्या.

        या स्पर्धेचे उद्धाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कुस्ती समितीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकुर, उपाध्यक्ष अनिल पुदाले,संजय मोरे, माजी नगरसेवककमलाकर चव्हाण, नितीन कासार, अमृत पुदाले,संतोष पुदाले,सरदारसिंग ठाकुर,पोलिस निरीक्षक विनोद घुगे डॉ. प्रमोद घुगे, शरीफ शेख, दत्तात्रय कोरे, बंडू पुदाले,सुधाकर चव्हाण, जीवन बिराजदार व राजाभाऊ देवकते हे उपस्थित होते.

 
Top