तुळजापूर /प्रतिनिधी- 

  पूर्वीच्या काळामध्ये ओव्या व गाण्यामधून बालमनावर संस्कार होत असतात ही परंपरा पुढे चाललेली पाहिजे याशिवाय साहित्यिकांनी आपल्या लेखनामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून लिखाण करावे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची साहित्यिकांनी चर्चा केल्यास त्याचा परिणाम धोरणात्मक निर्णयावर होऊ शकतो असे उद्गार दुसऱ्या बालाघाट साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काढले.

 तुळजापूर  येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने दुसरे बालाघाट साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते याचे उद्घाटन माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

 याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक इतिहास संशोधक प्रा. शरद गोरे हे अध्यक्षस्थानी होते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,  डॉ. अनिल शित्रे  डॉ. नरसिंग जाधव, योगैश केदार प्रमुख संयोजक ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की,  या बालाघाट साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असणारे बोलीभाषेतील बदल आणि कृषी क्षेत्रामध्ये होणाऱ्या घटना घडामोडी शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू समजून करावयाचे लिखाण याला प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी उद्घाटक माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. 

याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शरद गोरे यांनी विद्यमान कार्यकाळात महापुरुषांना विभागणी करण्याचे सुरू असलेले सत्र खेदजनक असून सर्व महापुरुष हे सर्व देशासाठी झटलेले आहेत त्यांना जातीपातीच्या बंधनामध्ये कोणीही अडकविण्याचा प्रयत्न करू नये तसेच आपण आपले आदर्श आणि आपले शक्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे असावे असे त्यांनी सांगितले. या संमेलनामधून नांगर धारी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विविध प्रश्नांवर लेखन करण्यासाठी नवनवीन साहित्यिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा ठेवलेली आहे शहरी भागामध्ये निर्माण होणारे साहित्य आणि ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असलेले साहित्य याच्यामध्ये ग्रामीण भागातील साहित्य श्रेष्ठ आहे असे सांगून दररोजच्या जीवनामध्ये येणारे अनुभव आपल्या साहित्यामध्ये आले पाहिजेत आणि नवीन साहित्यिकांनी आपल्या लिखाणामध्ये सातत्य ठेवावे सातत्य पूर्ण केलेले लिखाण निश्चितपणे आगामी काळासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारे असते सर्वांना आपलं वाटणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे .या कार्यक्रमाचे   सूत्रसंचालन भाग्यश्री देवकते यांनी केले व आभार प्रदर्शन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल शित्रे यांनी केले

 
Top