उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार - मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात ठाण्याने तर मुली गटात उस्मानाबादने अजिंक्यपद मिळवत इतिहास रचला. मुलीं गटात उस्मानाबादचे हे सलग दुसरे अजिंक्यपद असून नाशिकचे सलग दुसरे उपविजेतेपद आहे. तर ठाण्याने गेल्या वर्षी मिळवलेल्या तिसर्‍या क्रमांकावरून हनुमान उडी मारत अजिंक्यपदाला गवसणी घातली गेल्या वर्षी कुमारांमध्ये अहमदनगर व उस्मानाबादने विजेते व उपविजेतेपद मिळवले होते व या वर्षी या दोन्ही संघांना उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला.

  या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा विवेकानंद पुरस्कार कुमार गटात ठाण्याच्या रूपेश कोंढळकरला तर मुलींचा सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा सावित्री पुरस्कार उस्मानाबादच्या अश्विनी शिंदेला देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना पुनीत बालन ग्रुप कडून त्यांच्या नावावर नोंदणी करून इलेक्ट्रिक बाईक पुणे येथे देणार असल्याचे जाहीर केले.

मुलींमध्ये उस्मानाबादची नाशिकला सलग दुसर्‍या वर्षी धोबी पछाड

मुलींच्या अंतिम फेरीच्या सामन्यात उस्मानाबादने नाशिकवर १०-९ असे ५ मि. राखून एक गुणाने दणदणीत विजय मिळवत सलग दुसर्‍या वर्षी अजिंक्यपद मिळवले. मध्यन्तरला उस्मानाबादकडे ७-३ अशी ४ गुणांची आघाडी होती. उस्मानाबादच्या अश्विनी शिंदेने (४, ३.३० मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. तिला प्रणाली काळे (२.५०, १.३० मि. संरक्षण व १ गुण ), संपदा मोरे (१.४०, १ मि. संरक्षण व १ गुण ) यांनी चांगली साथ दिली. या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरच उस्मानाबादला सलग दुसर्‍या वर्षी नाशिकला धोबी पछाड देता आली तर नाशिकला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. नाशिक तर्फे सोनाली पवार (१.३०, २ मि. संरक्षण), दीदी ठाकरे (१.३० मि. संरक्षण व ५ गुण ) यांनी चांगला खेळ केला. मात्र उस्मानाबादच्या आक्रमक खेळापुढे नाशिकचा टिकाव लागू शकला नाही. मुलींमध्ये ठाणे व सांगलीने तृतीय क्रमांक पटकवला.

या स्पर्धेच्या पारितोषिक सोहळ्यासाठी खासदार सुनील तटकरे, माजी राज्यमंत्री आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राज्य खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खो खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य खो खो संघटनेचे सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.


 
Top