उस्मानाबाद   / प्रतिनिधी

 भारतामध्ये सन 1936 ला व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाचा प्रारंभ टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई या संस्थेने केला.  त्यानंतर संपूर्ण देशामध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा एक वेगळा नावलौकिक आहे.  टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई द्वारा तुळजापूर येथे 1986 ला रुरल कॅम्पस कार्यान्वित करण्यात आला आहे.  या रुरल कॅम्पसच्या उपसंचालक पदी येथील ज्येष्ठ प्रोफेसर डॉ.रमेश जारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रोफेसर डॉ.रमेश जारे हे सन १९८९ मध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर कॅम्पसमध्ये क्षेत्रकार्य व संशोधनकार्य प्रकल्पामध्ये सोशल वर्कर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणी, शेती, महिला सक्षमीकरण, भूकंपातील पुर्नवसनाचे कार्य, वडगांव लाख येथील आदर्श पाणलोट क्षेत्र प्रकल्पाचे कार्य, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण आणि विशेष कार्य करून पंचायतीराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. व्यवस्थेच्या माध्यमातून दलित, वंचित, दुर्लक्षित घटकांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावे व त्यांना विकासाच्या प्रवाहात आणावे यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पंचायतीराज व्यवस्था या विषयावरच पीएच.डी.केली आहे. अपार मेहनत घेवून शुन्यातून आपली ओळख निर्माण करणारे आदर्शवत व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे नाव संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात घेतले. 

संस्थेच्या स्थापनेपासुन आजतागायत त्यांनी सामाजिक कार्यकर्ता, विविध प्रकल्पांवर प्रकल्प समन्वयक, लेखक, संशोधक, बी.ए.इन सोशल वर्क अभ्यासक्रम तयार करणारे अभ्यासक, शैक्षिणक निती धोरण तयार करणारे नितीतज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उपकुलसचिव, प्रोफेसर,  अधिष्ठाता, विविध शासकीय, अशासकीय समिती प्रमुख, सदस्य अशा विविध पदांवर कार्य केले आहे.  त्यांच्या आजवरच्या विविध कार्याचा अनुभव व संस्थेच्या प्रगतीसाठी निःस्वार्थ भावनेतून केलेले कार्य, त्याग आणि समर्पण याचा सन्मान म्हणून टाटा संस्थेने त्यांना उपसंचालक पदाची जबाबदारी दिली आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर कॅम्पसच्या उपसंचालकपदी त्यांच्या झालेल्या नियुक्ती बद्द्ल टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनिक विभाग, अधिकारी, कर्मचारी त्याच बरोबर देशभरातील विविध विद्यापीठातील व महाविद्यालयातील मान्यवरांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.


 
Top