उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जपान, अमेरिका, कोरिया प्रजासत्ताक, ब्राझील व चीन या देशांमध्ये कोविड-19 विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच देशातील आगामी सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता तात्काळ आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत  सूचना दिल्या आहेत. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून चीन या देशात आढळून आलेल्या कोविड-19 विषाणूच्या BF-7 या प्रकाराने बाधित झालेले चार रुग्ण देशात आढळून आले असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. 

 या पार्श्वभूमीवर “प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक चांगला” या तत्त्वानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेने घाबरुन न जाता कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता खालील नमूद बाबींचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना नाक व तोंडावर मास्क लावावा.गर्दीच्या ठिकाणी (जसे लग्नसमारंभ, राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम इ.) जाणे टाळावे.सामाजिक अंतराचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फूट अंतर (2 गज की दूरी) ठेवावे. आपले हात नियमितपणे साबण व पाण्याने धुवावेत अथवा सॅनिटायजरचा वापर करावा. आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा. ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, जुलाब इ. लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या दवाखान्यास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करुन घ्यावे.सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये.नेहमी खोकताना, शिंकताना नाक व तोंड स्वच्छ रुमालाने/हात कोपरात दुमडून हाताने झाकून कोविड अनुरुप वर्तनाचे (C.A.B.) पालन करावे. शासनाकडून व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.असे आवाहन  डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

 
Top