संतधाम तेर येथील अमृत महोत्सव प्रारंभ : देखणे नियोजन 

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :

दया, क्षमा, शांती आणि करुणा भाव हा संत विचारांचा पाया आहे. जगाच्या कल्याणाची भूमिका संतानी नेहमीच मांडली आहे. त्यामुळे संत क्षमाशील व संवेदनशील असतात. म्हणून ते मांगल्याचा आग्रह धरतात. सकारात्मक विचार समाजात पसरला पाहिजे, हा सुध्दा संत विचारांचा पाया आहे. राग, लोभ आणि तत्सम विखार संपले की, संत विचारांच्या जवळ पोहोचता येते. कारण, निरपेक्ष प्रेम हि संत विचारांची शिकवण आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप.बंडा तात्या कराडकर यांनी केले.

तालुक्यातील श्री.क्षेत्र तेर येथील संतधाम परिसरात हभप.गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे-पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित अमृत महोत्सवाची सुरुवात हभप. बंडा तात्या कराडकर यांच्या कीर्तनाने झाली. तेव्हा ते बोलत होते.

यावेळी संतपीठावर हभप.गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांच्यासह हभप.महादेव महाराज बोराडे, हभप.जगन्नाथ महाराज देशमुख, हभप.शिवाजी महाराज गोवर्धनवाडीकर, हभप.नाना महाराज कदम, हभप.पद्मनाथ महाराज व्यास, हभप.नारायण उत्तरेश्वर, हभप.रघुनंदन महाराज, नायगावकर बाबा, रामकृष्ण शिंदे-पाटील, किरण सुर्यवंशी, दिनेश जाधव, विवेकानंद शिंदे-पाटील, शरद जाधव उपस्थित होते.

पुढे बोलताना हभप.कराडकर म्हणाले की, अध्यात्मात दिखाऊपणा करता येत नाही. विखार टाळले की, माणूस विवेकशील बनतो. त्यामुळे विवेकातून सामाजिक प्रगती साधण्यासाठी संत विचारांची समाजाला आजही गरज आहे. म्हणून संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त होत असलेला हा अमृत महोत्सव म्हणजे सामाजिक व आध्यात्मिक संचित आहे. आयुष्यभर संदिपान महाराज ज्या विचारासाठी जगले, तो विचार या सोहळ्यात पावलोपावली दिसत आहे.

या अमृत सोहळ्याच्या दुपार सत्रात संत तुकाराम महाराजाचे ११ वे वंशज हभप.कान्होबा महाराज देहूकर, संत व्यंकट महाराज संस्थानचे मठाधिपती हभप.लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री.क्षेत्र नागेश्वर संस्थान मुर्तडचे हभप.शिवकृष्णयोगी गंजीधर बाबा यांचे ओघवत्या भाषेत रसाळपूर्ण प्रवचन झाले.

आध्यात्मिक सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायक, वादक, फडकरी, गडकरी, विविध संस्थानचे अध्यक्ष, मठाधिपती तसेच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या आळंदी व पंढरपूर शाखेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील यांच्यावर प्रेम करणारे भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, पुढे तीन दिवस असलेल्या या महोत्सवात दिवसभर कीर्तन, प्रवचन, हरिकीर्तनासह काकडा भजन, विष्णुसहस्त्रनाम, हरिपाठ असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

--------------

देत राहाणं हि आध्यात्मिक वृत्ती - हभप.लाड महाराज 

अध्यात्म हि फार प्राचीन परंपरा आहे. विश्वाच्या कल्याणाची कामना संत शिकवण करते. भुकेलेल्या अन्न, ताहणलेल्या पाणी आणि उघड्यांना वस्त्र देण्याची वृत्ती म्हणजे संत विचारांचे अनुकरण असते. कारण, मानवता हि अध्यात्माची देणगी आहे. त्यामुळे देणं हि आध्यात्मिक वृत्ती आहे. ती वृत्ती हभप.संदिपान महाराज यांनी जोपासली आहे. त्यामुळे संत विचाराने लोकांचे प्रबोधन करण्यात त्यांनी आयुष्य खर्ची घातले. हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरोद्गार व्याकरणाचार्य हभप.अर्जुन महाराज लाड यांनी आपल्या हरिकीर्तनातून काढले.

--------------

...तर तुमची शताब्दी साजरी करण्याचा योग यावा - आ.राणा पाटील

हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांना  फार पूर्वीपासून बघतो आहे. त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. वारकरी परंपरेचे शिक्षण देणारी संस्था उभारण्यात सुध्दा त्याचे लक्षणीय योगदान असून त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे तेरचा कायापालट करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. तसेच त्यांची शताब्दी साजरी करण्याचा योग यावा, अशा शुभेच्छा तुळजापूर विधानसभेचे आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी दिल्या.

--------------

देखणे व उत्तम नियोजन...

चार दिवसीय या अमृत महोत्सवात भव्य शामियाना मंडप, उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम, आकर्षक प्रकाश योजना, उत्तम बैठक व्यवस्था, रुचकर व स्वादिष्ट भोजन, स्वच्छ शौचालये, भव्य पार्किंग, उत्तम निवास व्यवस्था, लाईव्ह प्रेक्षपण, थंडगार पाणी व शिस्तपूर्ण शांतता असे अतिशय देखणे व सुंदर नियोजन करण्यात आले आहे.

 
Top