उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

 सद्यस्थितीत f-IPV (Inactivated Polio Virus) चा नियमित लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर 6 आठवडे पूर्ण झाल्यावर पहिला डोस तसेच 14 आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस असे एकूण दोन डोस देण्यात येत आहेत. तथापि, शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दि. 01 जानेवारी 2023 पासून f-IPV लसीचा तिसरा डोस बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. या लसीकरणाचा उद्देश हा पोलिओ उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे, सामूहिक प्रतिकार शक्ती वाढविणे असा आहे.

 केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार माहे जानेवारी 2023 पासून हा तिसरा डोस समाविष्ट करण्यात येणार आहे. हा f-IPV लसीचा तिसरा डोस बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. डोस हा 9 ते 12 महिने या वयोगटात गोवर रुबेला डोसच्या पहिल्या डोस बरोबर देण्यात येणार आहे. या बाबत सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

 तरी सर्व पालकांनी डोस मधील बदल लक्षात घेऊन आपापल्या मुलांचे वयोगटा प्रमाणे बालकांना त्यांच्या वयाच्या 6 आठवडे पूर्ण झाल्यावर, 14 आठवडे पूर्ण झाल्यावर आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर f-IPV चे अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा असे तीन डोस जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे.


 
Top