उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग आणि आरोग्य विभागाच्या समित्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गिताना संजय गांधी निराधार योजना, अन्त्योदय योजना, बालसंगोपन योजना, प्रधानमंत्री विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, एआरटी औषधी घेण्यासाठी मोफत बस पास सुविधा आदी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागास जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी आदेशीत केले.

 या बैठकीमध्ये जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफिक अंन्सारी,जिल्हा जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ.मिटकरी, सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, एआरटी वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.निता पौळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डाप्कू उध्दव कदम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एनएचएम डॉ.किरण गरड, जिल्हा पर्यवेक्षक आयसीटीसी महादेव शिनगारे तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आदींची उपस्थिती होती. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचा आढावा पुढीलप्रमाणे सादर करण्यात आला.

   जिल्ह्यातील एचआयव्ही समुपदेशन आणि चाचणी केंद्र 92 कार्यरत असून या सर्व केंद्रावर  एचआयव्ही चाचणी मोफत सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले. एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तीकरिता मोफत एआरटी औषधी केंद्र 2 असून येथे एकूण 4 हजार 445 रुग्णांवर मोफत औषध उपचार सुरु आहेत.

    जिल्ह्याकरिता माहे एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 पर्यंतचे सामान्य गटांकरिता देण्यात आलेले एचआयव्ही चाचणीचे 100 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आणि गरोदर मातेचे एचआयव्ही चाचणीचे 114 टक्के उद्दिष्ट साध्य झाले असून सामान्य गटात एकूण 161 तर गरोदर माता 07 एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना मोफत एआरटी औषधी सुरु करण्यात आले आहेत.

  जिल्ह्यातील या वर्षी एचआयव्ही संसर्गित 7 गरोदर मातांची जन्माला आलेले 7 मुले तपासणी अंती एचआयव्ही संसर्ग मुक्त असल्याचे सांगितले आहे. तसेच मागील 2 वर्षापासून जिल्ह्यात सर्व एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या बालकांना एचआयव्ही पॉझिटीव्ह होण्यापासून प्रतिबंध करण्यात यश आल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डाप्कूचे उद्धव कदम यांनी सांगितले. 

 जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्गावर एचआयव्ही एड्स टोल फ्री नंबर 1097 प्रदर्शित करणे तसेच जिल्ह्यातील एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व गावांमध्ये गाव तिथे एचआयव्ही चाचणी मोहीम राबवून पुढील तीन वर्षात टप्या टप्याने पूर्ण करणे आहे.

     जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखाने, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील कामगार यांची वर्षातून दोन वेळा एचआयव्ही चाचणी करुन घेणे तसेच जिल्ह्यातील खंडीत असलेल्या लक्ष्य गट हस्तक्षेप प्रकल्प सुरु करण्याकरिता वरिष्ठ कार्यालयास पाठपुरावा करणे आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून डाप्कू कार्यालय व वॉकिंग कुलर आणि साठा रूम नव्याने बांधकाम करणे आदी बाबतीत सविस्तर चर्चा करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी यावेळी दिल्या.

   जिल्ह्यातील एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींना आजपर्यंत 6 हजार 961 इतक्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेंचा लाभ मिळून देण्यात आला आहे. या बैठकीचा अहवाल जिल्हा कार्यक्रम अधिकारी डाप्कूचे उद्धव कदम यांनी सादर केला.


 
Top