उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा दक्षता समिती पीसीपीएनडीटी ची बैठक आज दि.12 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. या बैठकी मध्ये विविध विषयवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने लिंग गुणोत्तर हा अत्यंत महत्वाचा निर्देशांक असल्याने आणि भूम, परांडा, वाशी उस्मानाबाद तुळजापूर या तालुंक्यामध्ये सातत्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत आहे त्यामुळे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यासाठी उपायजोजना म्हणून ग्रामपातळीवर सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या महत्त्वाच्या भूमिका राहणार असल्याबाबत बाबत सुचित केले आहे. तसेच, आजी आणि आजोबाची भूमिका, किशोर युवा संवाद करुन जागरूकता, नवविवाहित जोडप्यांच्या भेटीगाठी घेऊन गर्भलिंग निदान करणार नाही म्हणून शपथ घेणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, मुलगी जन्माला आल्यास ग्रामपंचायत मध्ये बाळाच्या आई वडिलांचा सत्कार करणे अशा अनेक माध्यमातून स्त्री जन्माचे स्वागत आणि मुलींचे महत्व पटवून देण्या संबंधित जनजागृती करणे, यासाठी ग्रामसभा मंचाचा उपयोग, खबरसाठी व्यापक प्रसिद्धी, आशा, अंगणवाडी, ANM, MPW इत्यादी कडून प्रामाणिक प्रयत्न, खेड्यापाड्यांमध्ये त्याची भूमिका असल्याने ग्रामस्तरांमार्फत गर्भलिंग निदान चाचणी (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी आदेशीत केले आहे.

 तसेच अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांची माहिती देणाऱ्यास रक्कम एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. महिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. सदर माहिती मिळाल्यास नजदिकच्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात संपर्क साधावा या बाबत प्रसिद्धी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच गावा गावात खबऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लिंग गुणोतर वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याबाबत प्रशासनास आदेशित करण्यात आले आहे, असेही यावेळी डॉ.ओम्बासे म्हणाले.

 या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, आरोग्य विभागाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय अधीक्षक उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभाग तसेच इतर कार्यालयीन प्रमुख उपस्थित होते.


 
Top