उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती मिळाल्यावरून एका तरूणाला अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. ही कारवाई 12 डिसेंबर रोजी उस्मानाबाद शहरातील बायपास रस्त्यावर हॉटेल साईकमलसमोर केली.

पोलिसांनी सांगितले की, अंगावर पिवळसर सदरा व करड्या रंगाची विजार परिधान केलेला एक तरूण अवैध पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक यशवंत जाधव यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिली. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे एका पथकाने सापळा लावला. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास साईकमल हॉटेलसमोर एक व्यक्ती आल्याने पथकाने संशयावरुन त्याची विचारपुस केली. त्याने त्याचे नाव किशोर लिंबराज माळी वय 34 वर्षे (रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद) असे सांगीतले. तो पथकास पाहुन गांगरल्यासाखा झाल्याने पथकाने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली. त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी धातुचे पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे असा एकुण अंदाजे 17 हजार 400 रूपये किंमतीचे पिस्तुल व काडतुसे मिळाले. पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील पिस्तुल व काडतुसे जप्त केली. त्याच्याविरुध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि- श्री. खरड करत आहेत.

ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि- यशवंत जाधव, पोउपनि- संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार समाधान वाघमारे, विनोद जानराव, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर यांच्या पथकाने केली.

 
Top