उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून उपग्रहाच्या छायाचित्रांचा वापर करत नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाची तीव्रता ठरवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे कारणाऱ्या महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर (MRSAC)  ला आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट दिली व केंद्राचे संचालक डॉ.ए.के.जोशी, कृषी शास्त्रज्ञ डॉ.प्रशांत राजनकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री.दिलीप कोलते यांच्याशी येथे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती घेत चर्चा केलीया संस्थेमध्ये भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था (इस्रो) व नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) च्या साहाय्याने उपग्रहामार्फत घेतलेल्या छायाचित्रांचे विविध तंत्रज्ञान वापरून विश्लेषण केले जाते व या माहिती आधारे निष्कर्ष काढले जातात.

उपग्रहांच्या माध्यमातून उपलब्ध छायाचित्रणाचे विश्लेषण करून नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची व्याप्ती व तीव्रता निश्चित केली जाऊ शकते. कृषी विभाग व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर (MRSAC) यावर काम करत आहे. आगामी काळात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची टक्केवारी या केंद्राच्या माध्यमातून काढली जाऊ शकते व या माहिती आधारे राज्य / केंद्र आपत्ती निवारण निकषाद्वारे मिळणारी मदत शेतकऱ्यांना थेट दिली जाऊ शकते. यामुळे पंचनामे व माहिती संकलनासाठी लागणारा वेळ कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात तात्काळ मदत देणे शक्य आहे. जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामाचे मॅपिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तीव्र टंचाई पाणलोट क्षेत्र निर्धारीत करून येथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अनुज्ञेय नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या अनुषंगाने वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो.  पीक कापणी या पीक विमा संबंधित येणाऱ्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत येथे तांत्रिक अभ्यास केला जात आहे. त्यामुळे याबाबत देखील या भेटीत प्रामुख्याने चर्चा झाली. पीक पाहणी, पीक पंचनामा, जमीन क्षेत्र मोजणी, डिजिटल मॅपिंग अशा अनेक क्षेत्रात ही संस्था काम करत असून याचा कृषी क्षेत्राला भविष्यात खूप मोठा फायदा होताना दिसून येणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आपण आग्रही असून  नैसर्गिक आपत्ती व पीक विमा यासाठी या संस्थेकडील माहितीचा उपयोग करून आगामी काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे मत आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी श्री.दीपक आलूरे, श्री.विक्रम देशमुख, श्री.नारायण नन्नवरे, श्री.सुशांत भूमकर उपस्थित होते.


 
Top